Join us  

"त्यांचं ब्रेकअप झालं पण...", करीना-शाहिदच्या नात्याबद्दल 'जब वी मेट'च्या दिग्दर्शकाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 1:07 PM

अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या लव्हस्टोरीची मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

Jab We Met : अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या लव्हस्टोरीची मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. एकेकाळी हे बॉलिवूडचं बहुचर्चित असणारं कपल होतं. बरीच वर्ष शाहिद आणि करीना कपूर एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर काही कारणास्तव या दोघांनी ब्रेकअप केलं. 'जब वी मेट'च्या सेटवर या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात येतं. आता याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी खुलासा केला आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'जब वी मेट' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटानंतर या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यवर घेतलं होतं. पण हा सिनेमा शूट करताना शाहिद आणि करीना कपूर दोघंही प्रचंड तणावात होते, आणि त्याचदरम्यान दोघांचा ब्रेकअप झाला. असं वक्तव्य इम्तियाज यांनी एका मुलाखती दरम्यान केलं.

इम्तियाज अली यांनी गलाता इंडियाला दिलेल्या मुलाखतीत या दोघांच्या ब्रेकअपबद्दल मौन सोडलं. दरम्यान त्यांनी करीना कपूर आणि शाहिदचं तोंडभरून कौतुकही केलं. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होण्याच्या दोन दिवसाआधी त्यांचं ब्रेकअप झालं. त्यांच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम चित्रपटाच्या शूटिंगवर झाला नाही असं ते म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, जवळपास संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं. त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतरही दोन दिवसाचं शूटिंग बाकी होतं. ते दोघंही प्रोफेशनल आहेत. आपल्या ब्रेकअपचा कोणताही परिणाम त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगवर होऊ दिला नाही. असं त्यांनी सांगितलं.

२००७ मध्ये 'जब वी मेट' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. रोमॅंटिक तसेच कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा सिनेमा तेव्हा हिट ठरला. या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना  कपूरने केलेल्या कामाचं सर्वस्तरातून कौतुक करण्यात आलं. 

टॅग्स :करिना कपूरशाहिद कपूरइम्तियाज अलीबॉलिवूडसेलिब्रिटी