मीनाक्षी कुलकर्णी, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - एखाद्या विशिष्ट क्षेत्रात पिढ्यानपिढ्या भक्कमपणे पाय रोवून उभे असलेले दिग्गज अन त्याच क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची इर्षा बाळगून नव्या दमाने उतरलेल्यांची स्वत:ला सिद्ध करण्यासाठीची धडपड. राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंत 'घराणेशाही'चा इतिहास काही नवीन नाही. मात्र २१ व्या शतकातील नवी पिढी फक्त बापाच्या नावाच्या ' टॅग' ला किंमत न देता स्वकर्तृत्वाने नाव कमवण्यास सिद्ध होताना दिसते.
गांधी, पवार, ठाकरे घराण्यापासून ते बिहारमध्ये लालू यादवांचा पुत्र आणि सर्व देशाचे लक्ष लागलेल्या ' उत्तर प्रदेश'च्या निवडणुकीतील अटीतटीच्या लढाईसाठी सज्ज असलेले मुलायमपुत्र अखिलेश.. सगळीकडे घराणेशाहीचा इतिहास दिसतो. पात्रता असो वा नसो पण बापजादे राजकारणात होते, फक्त याच कारणासाठी अनेक ' युवा' नेते डायरेक्ट राजकीय पक्षांच्या बोर्डावर झळकतात. ' ना खाऊंगा, ना खाने दूंगा' असा नारा मिरवणा-या आणि पात्रता नसेल तर तिकीट मिळणार नाही असे स्पष्ट करणा-या पंतप्रधानांचा वचक कायम असतानाही नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या घनघोर संग्रामात भाजपाच्या अनेक नेत्यांचे वारसदार निवडणुकीत उतरले आणि विजयी (!) झालेही. गांधी घराण्याचा वारसा चालवणारे तिस-या पिढीचे वारसदारही सध्या पहायला मिळतात, त्यांचा करीश्मा खरोखर किती फायदेशीर आहे, हा मूळ मुद्दा बाजूला ठेवून त्यांच्याच खांद्यावर पक्षाची धुरा ठेवून ' उदो उदो ' कायम आहे. एरवी गळ्यात गळे घालून वावरणारे हे निवडणुकीत मात्र कुत्र्या-मांजरांप्रमाणे भांडताना दिसतात. जनेतेने आपल्याला विकासासाठी निवडून दिल्याचा सोयीस्करपणे विसर पडतो आणि मग राजकीय अस्तित्वाची ही लढाई लढताना एकमेकांना शाहिस्तेखान, अफझलखानाची उपमा दिली जाते. मुंबई कुणाच्या बापाची नाही अशा घोषणा देतानाच ती आपलीही बटीक नाही याचा मात्र त्यांना विसर पडतो. आर्थिक राजकारण आणि लाभाच्या मोहातून निवडणुकू लढवताना सामान्य नागरिक आणि त्यांच्या समस्यांकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्षच केले जाते.
देशाच्या राजकारणाचे हेच प्रतिबिंब सिनेसृष्टीतही दिसते. चोप्रा, बच्चन, कपूर, खान, भट्ट, जोहर यांच्या कॅम्पची मक्तेदारी गेल्या अनेक दशकांपासून कायम असून एखादा 'शाहरूख खान' इथे बादशाह बनू शकतो. मात्र तेही याच कॅम्पच्या चित्रपटात झळकून. मात्र या सर्वांमध्ये एक वेगळा चेहरा दिसतो तो आघाडीची अभिनेत्री कंगना राणौतच्या रुपाने. हिमाचल प्रदेशमधील एका खेड्यातून आलेली ही पहाडी मुलगी, ना चांगली भाषा, ना अभिनयाचा काही अनुभव. अभिनेत्री बनण्याच्या स्वप्नाला खुद्द कुटुंबियांनीच सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला, वडिलांनी तर बोलणंही टाकल. तरीही स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांशी लढा देऊन, मुंबईसारख्या मायानगरीत येऊन, प्रसंगी फूटपाथवर झोपून दिवस काढणारी ही मुलगी आज बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. खिशात तीन राष्ट्रीय पुरस्कार घेऊन मिरवणा-या कंगनाचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता.
स्पष्टवक्ती, फटकळ, मनात येईल ते बोलणारी, कोणाचीही भीडभाड न बाळगणारी कंगना कोणालाही शिंगांवर घ्यायला तयार असते हे आदित्य पांचोली, हृतिक रोशन, करण जोहर यांच्यासारख्या प्रस्थापितांशी झालेल्या लढाईतून निश्चितच समोर येते.
दशकभरापासून अथक मेहनत करत एक-एक चित्रपट मिळवत करिअरमध्ये आज यशस्वी टप्प्यावर पोचलेल्या कंगनाचा घराणेशाहीला तीव्र विरोध आहे. फक्त एका बड्या इसमाचा मुलगा-मुलगी किंवा नातेवाईक लागतो म्हणून शानदार पदार्पण करणारे आणि चुटकीसरशी ' हिट' मूव्हीस्टार ठरणा-या या कलाकारांविरोधात कंगनाने नेहमीच आवाज उठवला आहे. करण जोहरच्या चॅट शोमध्ये कंगनाने जाहीरपणे या विषयावर मत मांडले. एवढेच नव्हे तर खुद्द करणलाही घराणेशाहीचा पुरस्कर्ता ठरवत त्याला ' माफिया' अशी उपाधीही दिली. स्वत:च्याच शोमध्ये झालेला हा अपमान आणि उडालेली आरोपांची राळ करणला नक्कीच पचवता आली नाही आणि तो अत्यंत उथळपणे तिला ' स्त्रीत्वाच्या नावाने गळा काढणारी' ठरवून मोकळा झाला. तिची औकात ठरवत 'वूमन कार्ड' चा उबग आल्याचेही त्याने म्हटले. 'चित्रपटसृष्टीत राहण्याच्या, इथल्या राजकारणाचा एवढाच कंटाळा आला असेल तर ' कंगनाने ही इंडस्ट्री सोडावी, असे ऐकवण्यासही' त्याने मागेपुढे पाहिले नाही.
मात्र १२ गावचं पाणी प्यायलेली आणि अनेक यशापयश पचवलेली कंगना त्याला कसली ऐकत्ये? तिने त्याला त्याच्याच शब्दांत उत्तरं देत इंग्रजीचया न्यूनगंडातून बाहेर काढल्याबद्दल आभार तर मानलेच पण घराणेशाहीचा विरोध करत स्वकर्तृत्वार उत्तमोत्तम सिनेमे मिळवून १०० कोटींच्या पार गल्लाही जमवला. आणि सिनेमा इंडस्ट्री कोणाच्या बापाच्या मालकीची नसून देशातील सर्व नागरिकांना तिथे काम करण्याचा पुरेपूर हक्क असल्याचेही तिने सुनावले.