Join us  

अभिनेते मुकेश ऋषी यांना कसा मिळाला 'सरफरोश'? म्हणाले, 'आमिरच्या सांगण्यावरुन...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 3:34 PM

९० च्या दशकातील बॉलिवूडमधील आयकॉनिक खलनायक म्हणून मुकेश ऋषी यांना ओळखलं जातं.

Mukesh Rishi : ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील आयकॉनिक खलनायक म्हणून  मुकेश ऋषी यांना ओळखलं जातं. 'गुंडा', 'जुडवा', 'सूर्यवंशम' तसेच 'बंधन' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी निभावलेली खलनायकाची भूमिका आजही चाहत्यांच्या कायम लक्षात आहे. या चित्रपटांमध्ये मुकेश ऋषी यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले.

'सरफरोश' या सिनेमामध्ये त्यांनी आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यात अभिनेत्याने साकारलेल्या 'सलीम' या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सरफरोशनंतर त्यांच्यासाठी दक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनयाचे द्वार खुले झाले. अलिकडेच 'रंगमंच इंडिया'सोबत इन्स्टाग्राम लाईव्ह  दरम्यान, संवाद साधताना त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. २५ वर्षापूर्वी त्यांना सरफरोशमध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली यावर त्यांनी भाष्य केलं आहे. 

काय म्हणाले मुकेश ऋषी - 

''सुरूवातीला माहिती नसते की कसा स्वरुपाचं काम करायला मिळेल. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसल्यामुळे काही करेन की नाही असं वाटत होतं. त्यानंतर काम केल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकायल्या मिळाल्या. सुरूवातीच्या काळामध्ये सरफरोशसारख्या चित्रपटामध्ये काम करायला मिळेल याची आशा देखील नव्हती. ''

आमिर खानमुळे काम करण्याची संधी मिळाली-

''आमिरमुळे मला त्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याने मला सांगितलं होतं की, एक रोल आहे आणि तु तो उत्तम करशील, त्याने मला विचारलं तु करशील का?  मी सांगितलं, तो रोल मी करेन. त्यानंतर समजलं की चित्रपटाचे दिग्दर्शक माझी स्क्रीन टेस्ट घेणार आहेत, मी ती टेस्टही दिली. सरफरोशचा प्रवास अविस्मरणीय आहे. माझ्या अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये पहिल्याच चित्रपटात मला मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं.'' त्या चित्रपटामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं, असा खुलासा मुकेश ऋषी यांनी इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान केला. 

साऊथमध्ये वेळा पाळल्या जातात- 

मुकेश ऋषी यांनी सरफरोश नंतर दक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. त्यानंतर दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताना आलेले अनुभव त्यांनी कथन केले. बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सारखंच काम असतं. पण तिथे वेळेचं बंधन असतं. तिथे वेळेवर काम करण्याची पद्धत आहे. असं ते म्हणाले. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी