हिंदी चित्रपट निर्मात्यांसाठी बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांतील क्राइम आणि राजकारण हा नेहमीच कथेचा विषय राहिला आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांचा उद्या शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये झळकणारा ‘जय गंगाजल’ या प्रियांका चोप्रा अभिनित चित्रपटालाही बिहारमधील गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. बिहारच्या बेतियाच्या बडहरवा गावात जन्मलेले प्रकाश झा यांनी आपल्या अनेक चित्रपटांतून बिहारमधील क्राइम, तेथील समस्या, प्रथा-परंपरा व राजकारणाला आपल्या चित्रपटाचा केंद्रबिंदू बनवलेले आहे. ‘गंगाजल १’ हा झा यांचा पहिला चित्रपटही बिहारवर केंद्रित होता. त्याचाच सीक्वल असलेला ‘जय गंगाजल’ हाही बिहारातील सामाजिक समस्या, गुन्हेगारी व राजकारणाभोवती फिरणारा चित्रपट आहे. बिहार व उत्तर प्रदेशातील क्राइमवर बेतलेले असे अनेक चित्रपट आहेत, त्यावर एक नजर...सेहरसन २००५ मध्ये आलेला अॅक्शन क्राइम ड्रामा ‘सेहर’ हा कबिर कौशिक याने दिग्दर्शित केलेला चित्रपट उत्तर प्रदेशातील क्राइमभोवती फिरणारा होता. ९० च्या दशकात उत्तर प्रदेशातील वाढलेली गुन्हेगारी आणि पोलिसांपुढील आव्हान असा या चित्रपटाचा विषय होता. गँग आॅफ वासेपूर : गँग आॅफ वासेपूर कदाचित बिहारवर साकारलेला सर्वाधिक चर्चित चित्रपट आहे. अनुराग कश्यपचे अप्रतिम दिग्दर्शन आणि मनोज वाजपेयी व नवाजुद्दीन सिद्दकी यांचा कौतुकास्पद अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. यातील बिहारी डायलॉग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. झारखंडच्या (तत्कालीन बिहार) धनबाद येथील कोल माफियांच्या अवतीभवती फिरणाऱ्या या चित्रपटात दोन कुटुंबातील पारंपरिक शत्रुत्व दाखवले होते.गंगाजलआता ज्या ‘जय गंगाजल’ची चर्चा जोरात सुरू आहे, त्याचाच पहिला भाग ‘गंगाजल’ नावाने सन २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगाजल’ बिहारातील पोलीस आणि गुन्हेगारी विश्व यांच्या गलिच्छ राजकारणाच्या विषयावर बेतलेला चित्रपट होता. अजय देवगणने यात एका गंभीर व प्रामाणिक एसपीची भूमिका वठवली होती. भागलपूरमध्ये कैद्यांचा डोळा फोडण्याच्या सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात बिहारच्या गुन्हेगारी विश्वाची एक काळी बाजू अतिशय प्रभावीपणे दर्शवली गेली होती.शूलतुम्ही मनोज वाजपेयीचे चाहते असाल, तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघितला असेल. राम गोपाल वर्मा यांनी १९९९ मध्ये तयार केलेल्या या चित्रपटाची कथा गुन्हेगारीवर आधारित होती. ई. निवास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात बिहारमधील राजकारणाच्या अपराधीकरणाचे अतिशय धक्कादायक चित्रण करण्यात आले होते. मनोज वाजपेयीने यात एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
यूपी-बिहारचा गुंडाराज पडद्यावर!
By admin | Updated: March 4, 2016 01:18 IST