Join us  

हत्येचा आरोप ते थेट छोटा राजनशी कनेक्शन, बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार ही वादग्रस्त स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 10:07 AM

तिच्यावर छोटा राजनसोबत मिळून पत्रकार जे. डे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता.

भारतीय टेलिव्हिजनच्या सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस १७ (Bigg Boss 17) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. हा शो कलर्स टीव्हीवर १५ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहे. यावेळी बिग बॉसच्या  घरात कोणकोण सदस्य जाणार याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांची या शोसाठी एन्ट्री निश्चित झाली आहे. लेटेस्ट रिपोर्टनुसार पत्रकार जिग्ना वोरालाही याशोसाठी अप्रोच करण्यात आला. 

लेटेस्ट रिपोर्टनुसार जिग्ना वोरा देखील बिग बॉस 17 मध्ये एंट्री  करणार आहे. जिग्ना व्होरा क्राईम रिपोर्टर असून तिने मुंबई मिरर, फ्री प्रेस जर्नल आणि मिड डेसाठी काम केले आहे. आता जिग्ना वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस 17 मध्ये दिसणार आहे.

कोण आहे जिग्ना वोरा?जिग्ना वोरावर छोटा राजनसोबत मिळून पत्रकार जे. डे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. अलीकडेच हंसल मेहताने त्याच्यावर 'स्कूप' नावाची वेबसीरिजही बनवली होती. जिग्ना वोराच्या अटकेची कथा यात दाखवण्यात आली होती. 2011 मध्ये मिड-डे रिपोर्टर ज्योतिर्मय डे यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. जिग्ना वोरा ही त्या हत्येतील दोन प्रमुख संशयितांपैकी एक होती. एशियन एजमध्ये ती पत्रकार होती. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा छोटा राजन आणि जिग्ना वोरावर हत्येचा आरोप होता आणि त्यानंतर नोव्हेंबर 2011 मध्ये जिग्नाला ताब्यात घेण्यात आले. पत्रकार जिग्ना वोराने व्यावसायिक वैमनस्यातून जे. डे यांची हत्या करण्यासाठी छोटा राजनला चिथावल्याचा आरोप तपासयंत्रणेने ठेवला. मात्र, तपासयंत्रणा हे सिद्ध करू न शकल्याने न्यायालयाने तिची निर्दोष सुटका केली. 6 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर जिग्ना वोराबाहेर आली.  

टॅग्स :बिग बॉसजे. डे हत्या