ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - तुषार कपूर बाबा बनला हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. तुषारचे लग्न झालेले नसले तरी तो एका मुलाचा बाप बनला आहे. आयव्हीएफ टेक्नॉलॉजी आणि सरोगसी मदरच्या साहाय्याने तो एका मुलाचा पिता बनला आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्याच्या मुलाचा जन्म झाला.
'लक्ष्य' असे त्याने मुलाचे नामकरण केले असून, कपूर कुटुंबातील ते पहिले नातवंड आहे. अभिनेता जितेंद्र आणि त्याची पत्नी शोभा आजी-आजोबा झाले आहेत. वयाच्या चाळीशीपूर्वी आपण मुल दत्तक घेऊ किंवा सरोगसीच्या माध्यमातून पिता बनू असे तुषारने आपल्या मित्रांना सांगितले होते. लक्ष्य आता घरी आला असून त्याची प्रकृती उत्तम आहे. पिता बनण्याचा अनुभव एकदम वेगळा आहे. माझ्या ज्या भावना आहेत त्या सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत असे त्याने सांगितले आहे.
आमच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण असून आम्ही तुषारच्या निर्णयाचे पूर्ण समर्थन करतो. एक मुलगा म्हणून तुषारने त्याच्या सर्व जबाबदा-या व्यवस्थित पूर्ण केल्या आहेत त्यामुळे लक्ष्यचा पिता म्हणूनही तो यशस्वी होईल याची खात्री आहे असे जितेंद्रने सांगितले. तुषार गेली नऊ महिने जसलोकमध्ये येत असून तो त्याच्या बाळाच्या प्रत्येक वाढीकडे बारकाईने लक्ष देत होता असे जसलोक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.