'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसायला भाग पाडणारा अभिनेता भालचंद्र उर्फ भाऊ कदमने डिजिटल माध्यमात पदार्पण केले आहे. झी 5 अॅपवर नुकतीच दाखल झालेल्या 'लिफ्टमन' या मराठी वेबसीरिजमध्ये ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात प्रेक्षकांना सिच्युएशनल कॉमेडीचा आस्वाद घेता येणार आहे.
'लिफ्टमन' या मालिकेचे बहुतेक शूटिंग लिफ्टमध्ये झाले असून खाली-वर जाण्याच्या प्रवासात भाऊ आणि त्यांच्या विनोदबुद्धीचा सामना करावा लागलेली अनेकविध व्यक्तिमत्व या मालिकेतून समोर येतात. भरीस भर म्हणजे त्यांच्यासोबत लिफ्टमध्ये असताना लिफ्ट ब्रेक डाउन होऊन अडकून पडण्याची कल्पना तुम्ही करू शकता का? भाऊंचे विनोदाचे टायमिंग बघता, खो खो हसवण्याखेरीज दुसरे काही घडेल असे अपेक्षितच नाही.
या मालिकेबद्दल भालचंद्र (भाऊ) कदम म्हणाले, ''लिफ्टमन'ची संकल्पना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि झी5 सारखे माध्यमांचे नवीन मार्ग स्वत:ला आपसूक अशा कल्पक फॉरमॅट्सकडे कसे घेऊन जातात हे बघून मी रोमांचित झालो आहे. या मालिकेसह मी वेबच्या जगात शीर्षक भूमिकेद्वारे प्रवेश करत आहे. प्रवेशासाठी याहून अधिक चांगली संकल्पना मला निवडता आली नसती. स्मार्टफोन आता इतका सहज झाला आहे की, प्रेक्षकांपुढील मनोरंजनाचे पर्यायही हळुहळू बदलत आहेत. आज सर्वकाही शब्दश: एखाद्याच्या हाताच्या बोटांवर आहे आणि अशा परिस्थितीत मागे राहून कसे चालेल?''लिफ्टमन' ही १० भागांची वेब मालिका असून प्रत्येक भाग ८-१० मिनिटांचा आहे. प्रेक्षकांना वन लाइनर्स आणि विनोदांनी भरलेल्या गमतीशीर लिफ्टसफरीला तो घेऊन जाईल. भाऊ कदमच्या 'लिफ्टमन' या वेब सीरिजला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.