Join us  

वडिलांविषयीचा किस्सा सांगताना भरत जाधवच्या डोळ्यात आले अश्रू; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 4:46 PM

भरत जाधव हा एक अष्टपैलू अभिनेता तर आहेच परंतु मुलगा म्हणून आदर्श आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अफलातून अभिनेता म्हणून भरत जाधव यांची ओळख आहे. विनोदी भूमिकांपासून ते अनेक गंभीर धाटणीच्या भूमिका साकारत भरतने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य केलं आहे. मालिका असो, चित्रपट असो किंवा नाटक तिन्ही क्षेत्रात भरत नेहमीच सर्रस ठरला आहे.  लाडक्या भरत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. भरत जाधव हा एक अष्टपैलू अभिनेता तर आहेच परंतु मुलगा म्हणून आदर्श आहे. त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये वडिलांचा एक भावनिक किस्सा सांगितला.

 जाधव म्हणाला, माझे वडील मुंबईत टॅक्सीचालक होते. तेव्हा एक दिवशी ते रात्री घरी आले आणि मला विचारलं, तुझा आज शिवाजी मंदिरला प्रयोग होता का? त्यावर मी म्हणालो हो.. काय झालं.. तर वडील म्हणाले, 'अरे तुझ्या नाटकाला आलेल्या एका प्रवाशाने उशीर झाला म्हणून माझी आई-बहिण काढली. मला खूप शिव्या दिल्या. पण आपल्या मुलाच्याच नाटकाला जाण्यासाठी भांडतायत हे बघून बरं वाटलं.. मी काही बोललो नाही'. 

पुढे त्यांनी सांगितले, 'हे ऐकून मला फार वाईट वाटलं. वडीलांचा हा अपमान माझ्या जिव्हारी लागला. मी त्यांना यापुढे टॅक्सी चालवू नका म्हटलं. तुम्हाला दिवसभर टॅक्सी चालवून दिवसाचे १००  रुपये मिळतात. मी तीन प्रयोग करून ३०० रुपये कमवीन. पण तुम्ही टॅक्सी चालवणं सोडा. पण, त्यांचा मोठेपणा बघा त्यांनी सहा महीने वाट पाहिली.  कारण उद्या नाटकाचा भरवसा नाही, ते चालले नाही तर काय करायचे. सहा महिने टॅक्सी चाळीत तशीच उभी होती'. म्हणून मी मित्रांना सांगतो आई-वडिलांना सांभाळा. मी आज जो काही तो माझ्या आई-वडिलांमुळेच आहे'.

भरत जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ते सध्या चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजन क्षेत्रातही कार्यरत आहे. टीव्ही विश्वाबद्दल बोलायचे झाल्यास ते शेवटचे 'सुखी माणसाचा सदरा'मध्ये दिसले होते. शिवाय महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये त्यांच्या नाटकांचे दौरेही सुरू आहेत. अस्तित्व या नाटकाद्वारे पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यास सज्ज आहेत. यापूर्वी त्यांचे सही रे सही, ऑल द बेस्ट, श्रीमंत दामोदर पंत यांसारखी नाटकं खूप गाजली आहेत.

टॅग्स :भरत जाधवमराठी अभिनेतासिनेमा