Join us
Daily Top 2Weekly Top 5

निर्मिती सावंत आणि भरत जाधव दिसणार जजच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 17:43 IST

महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करणार आहेत कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार अर्थातच निर्मिती सावंत आणि भरत जाधव.

ऑफिसच्या वेळा, मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद टेन्शनची कारणं एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात खळाळतं हास्य कुठेतरी हरवत चाललंय. तुमच्या याच समस्येवर हास्याचं औषध घेऊन येतोय ‘स्टार प्रवाह’चा नवा कॉमेडी शो ‘एक टप्पा आऊट’. कार्यक्रमाचं नाव जितकं हटके आहे तितकीच हटके असेल या शोची संकल्पना. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम करणार आहेत कॉमेडीचा बादशाहा जॉनी लीवर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार अर्थातच निर्मिती सावंत आणि भरत जाधव. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे पार पडलेल्या ऑडिशनमधून तब्बल ३६ स्पर्धकांची निवड करण्यात आलीय. या स्पर्धकांमधून १६ स्पर्धकांमध्ये कॉमेडीची लढत रंगेल.

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना जॉनी लीवर म्हणाले, ‘ह्युमर आहे म्हणूनच त्या जागी जज म्हणून जॉनी लीवर आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘एक टप्पा आऊट’च्या निमित्ताने नव्या टॅलेण्टसाठी खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. या अनोख्या संधीचा लाभ सर्वांनीच घ्यायला हवा. ‘एक टप्पा आऊट’मध्ये माझा सहभाग आहे याचा एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अभिमान आहे.’

निर्मिती सावंत आणि भरत जाधव देखिल या शोसाठी खूपच उत्सुक आहेत. ‘स्पर्धकांचा उत्साह आणि टॅलेण्ट खरोखर थक्क करणारं आहे. या मुलांकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने खूप चांगला कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. खळखळून हसण्याचं निमित्त ‘एक टप्पा आऊट’ तुम्हाला देईल याची आम्हाला खात्री आहे अशी भावना निर्मिती सावंत आणि भरत जाधव यांनी व्यक्त केली.’

‘सध्या जगाला हसण्याची आणि हसवण्याची गरज आहे. यासाठीच स्टार प्रवाह वाहिनी ‘एक टप्पा आऊट’ हा अनोखा स्टॅण्ड अप कॉमेडी शो घेऊन येत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या टॅलेण्टचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाईल. दिग्गज परीक्षक आणि सुप्रसिद्ध कलाकार मंडळींच्या सानिध्यात नवख्या कलाकारांना मार्गदर्शन केलं जाईल

टॅग्स :भरत जाधव