अशोक सराफ (ashok saraf) यांना काही दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार, असल्याची घोषणा करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने अशोक सराफयांना 'पद्मश्री' जाहीर केला. हा मानाचा पुरस्कार उशीरा मिळाला म्हणून अशोक सराफ यांना दुःख आहे का याविषयी त्यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना मन मोकळं केलं.
पद्मश्री पुरस्काराबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?
अशोक सराफ पद्मश्री पुरस्कार उशीरा मिळाला म्हणून दुःखी आहेत का, हे विचारताच ते म्हणाले की, "पद्मश्री पुरस्कार उशीरा मिळाला किंवा लवकर मिळाला हा प्रश्नच येत नाही. हा पुरस्कार मिळाला हे माझ्यासाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी असा एकटा नट नाहीये ज्याने इंडस्ट्रीत आतापर्यंत काहीतरी करुन दाखवलं असेल. असे बरेच लोक आहेत की. याशिवाय बरेच कलाकार या पुरस्कारापासून वंचित राहिले असतील. मी पण त्यातलाच एक आहे. त्यामुळे त्याचा वेगळा विचार करायचाय असं नाही."
"तुझी जेव्हा वेळ आली तेव्हा तुला मिळालं. त्यामुळे त्याचं मला काही दुःख नाहीये. हा पुरस्कार मिळावा असं कोणालाही वाटतं. पण नाही! मला देत नाहीत, असं कधीच वाटलं नाही. त्यांनी माझा सत्कार केलाय याचा मला जास्त आनंद आहे."
"मला लहानपणी चांदीचा बिल्ला मिळाला होता. ते सुद्धा वयाच्या ६ व्या वर्षी एकांकिकेत काम केलं होतं म्हणून. तेव्हापासून वाईट सवय जडलेली आहे की, चांगलं काम करायला पाहिजे तर तुला काहीतरी मिळेल. त्यामुळे मी लक्षात ठेवलंय की, काहीतरी चांगलं काम करावं अन् जे करतोय ते लोकांना आवडलं पाहिजे. माझी भूमिका त्यांना काहीतरी विचार करण्यासारखी वाटली असेल तरी माझ्यासाठी खूप आहे. ते करण्याचा मी सतत प्रयत्न केला. प्रयत्न केल्याशिवाय काही साध्य होत नाही."