Join us

Arijit Singh Birthday Special : या दिग्दर्शकाने अरिजीत सिंहला बॉलिवूडमध्ये दिली गाण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 10:47 IST

अरिजीत सिंहने फेम गुरूकुल या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

ठळक मुद्देदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली. सावरियाँ या चित्रपटातील यू शबनमी हे गाणे त्याने गायले. हे गाणे चांगलेच गाजले.

फिर ले आया दिल, तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे, छन्ना मेरेया यांसारखी अनेक हिट गाणी अरिजीत सिंहने दिली आहेत. अरिजीत सिंहच्या करियरला केवळ 14-15 वर्षं झाली असली तरी त्याची हिट गाण्यांची यादी खूप मोठी आहे. अरिजीत सिंहचा आज म्हणजेच 25 एप्रिलला वाढदिवस असून त्याचा हा 32 वा वाढदिवस आहे. 2005 मध्ये त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. खूपच कमी वेळात त्याने बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. आज तर त्याच्या आवाजाचे अनेक फॅन आहेत. देशात नव्हे तर जगभर अर्जितची गाणी आवडीने ऐकली जातात. 

अरिजीत सिंहने फेम गुरूकुल या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या रिअॅलिटी शो चे विजेतेपद त्याला मिळवता आले नाही. पण या रिअॅलिटी शो नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली. सावरियाँ या चित्रपटातील एक गाणे त्याने गायले होते. पण काही कारणास्तव हे प्रदर्शित झाले नाही. पण यानंतर त्याला कामे मिळत गेली. आज अरिजीतने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत. 

अरिजीत सिंहला बर्फी चित्रपटातील फिर ले आया दिल आणि शंघाई चित्रपटातील दुआ या गाण्यांसाठी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला पुरस्कार मिळाले होते. आजपर्यंत त्याला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2013 ला प्रदर्शित झालेल्या आशिकी 2 मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे तर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

अरिजीत सिंहच्या गाण्याचे आज अनेक दिवाने असले तरी तो स्वतःची गाणी कधीच ऐकत नाही. त्यानेच स्वतः ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. तू तुझी गाणी ऐकतोस का असे त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. त्यावर माझी गाणी ऐकून मला भीती वाटते. त्यामुळे मी ती ऐकत नाही. एवढेच नव्हे तर माझी पत्नी देखील माझी गाणी ऐकत नाही असे त्याने सांगितले होते. 

टॅग्स :अरिजीत सिंह