Join us  

अधुरी एक कहाणी! हेमा मालिनींशी लग्न करण्याच्या तयारीत होते जितेंद्र, बोहल्यावर चढणार इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 1:12 PM

बॉलिवूड अभिनेते जितेंद्र (Jitendra) आज ७ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करत आहेत.

बॉलिवूड अभिनेते जितेंद्र (Jitendra) आज ७ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र इंडस्ट्रीत त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातात. जितेंद्र यांची फिल्मी कारकीर्द खूप यशस्वी ठरली. जंपिंग जॅक या नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ७ एप्रिल, १९४२ रोजी अमृतसर येथे जन्मलेल्या जितेंद्र यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. जितेंद्र यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत आले होते. जितेंद्र हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या प्रेमात होते, दोघे लग्नदेखील करणार होते, पण असं काही घडलं की हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली.

जितेंद्र यांनी ७० च्या दशकात फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. गीत गाए पत्थरों ने हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांच्या चित्रपटांची इंडस्ट्रीमध्ये खूप चर्चा होती. तसेच त्यांची लव्ह लाईफ देखील चर्चेचा विषय ठरला होता. शोभा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असूनही त्यांनी हेमा मालिनींना डेट करायला सुरुवात केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघे लग्न करणार होते, पण धर्मेंद्र यांच्यामुळे लग्न होऊ शकले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र शोभा कपूर १४ वर्षांच्या असताना त्यांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी बराच वेळ एकमेकांना डेट केले. त्यावेळी जितेंद्र सिने करिअरमध्ये संघर्ष करत होते आणि शोभा ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करत होत्या. शोभा यांना नोकरीमुळे अनेकदा विदेशात जावे लागायचे. अशा परिस्थितीत त्यांची फारशी भेट होत नव्हती. दरम्यान, जितेंद्र यांचे नाव हेमा मालिनींशी जोडले जात होते. दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्याचे बोलले जायचे, तसेच त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता, असे सांगितले जाते. 

हेमा मालिनी यांच्यामुळेच शोभा कपूर आणि जितेंद्र यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जाते. हेमा मालिनी आणि जितेंद्र लग्न करणार होते पण शेवटच्या क्षणी धर्मेंद्र त्यांच्या मार्गात अडथळा बनले. ते तिथे शोभा कपूर यांच्यासोबत पोहोचले होते, त्यानंतर बराच गोंधळ झाला आणि त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर जितेंद्र पुन्हा एकदा शोभा कपूरबरोबर रिलेशनशीपमध्ये आले आणि ३१ ऑक्टोबर १९७४ रोजी दोघांनी गुपचूप लग्नगाठ बांधली. 

टॅग्स :जितेंद्रहेमा मालिनीधमेंद्र