ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या 'सरकार'मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनाशी साधर्म्य साधणारी सुभाष नागरेची व्यक्तिरेखा बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. या चित्रपटाचे व त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. मात्र बिग बी आता खरोखर मोठ्या पदड्यावर बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार असून त्यांचा मुलगा राहुल ठाकरे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असल्याचे समजते. या चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा कोणी साकारावी यासाठी एक पोलही घेण्यात आला व अमिताभ बच्चन यांच्या नावालाच सर्वाधिक पसंती मिळाल्याचे समजते. या भूमिकेसाठी अमिताभ यांचयाशिवाय शाहरुख खान, अक्षय कुमार व मनोज वाजपेयी यांची नावेही चर्चेत होती. मात्र अमिताभ बच्चन यांच्याशिवाय इतर कोणीही ही भूमिका उत्तमपणे निभावू शकेल असे कोणालाही वाटत नसल्याने अमिताभ यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. मात्र याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून चित्रपटातील इतर व्यक्तिरेखांसाठी कलाकारांची निवड होणे अद्याप बाकी असल्याचे समजते.