बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा त्यांच्या ट्वीटचीही चर्चा होते. बिग बी ट्वीटमधून त्यांच्या लाइफमधील अपडेट्सही अनेकदा शेअर करत असतात. आतादेखील बिग बींनी केलेल्या एका ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिग बींनी फॉलोवर्सची संख्या कशी वाढवायची याबद्दल चाहत्यांना प्रश्न विचारला.
खूप प्रयत्न करूनही बिग बींचे X अकाऊंटवरील फॉलोवर्स वाढत नसल्याने त्यांना चिंता सतावत आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलं आहे. त्यांचे X अकाऊंटवर ४९ मिलियन फॉलोवर्स आहेत. पण, ही संख्या वाढत नाहीये. त्यामुळे फॉलोवर्स वाढवण्यासाठी काही उपाय असतील तर सांगा असं बिग बींनी चाहत्यांना म्हटलं आहे. "T 5347- खूप प्रयत्न करत आहे. पण, ४९ मिलियन फॉलोवर्सची संख्या वाढतच नाहीये. काही उपाय असेल तर सांगा", असं बिग बींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
बिग बींच्या या ट्वीटवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना फॉलोवर्स वाढवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. काहींनी ग्रोकला विचारण्याचा सल्ला बिग बींना दिला आहे. एकाने कमेंटमध्ये "जया बच्चन यांच्यासोबत फोटो टाका", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने थेट रेखासोबत सेल्फी अपलोड करण्याचा सल्ला बिग बींना दिला आहे. एकाने बिग बींना पॉडकास्ट सुरू करण्याचा सल्लाही दिला आहे.