Join us  

अक्षय कुमारने सुरू केलं 'वेलकम टू द जंगल'चं शूटिंग, मजेशीर व्हिडीओ शेअर करत म्हणाला, "आम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 5:50 PM

Welcome 3 : अक्षयने शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत सिनेमाबाबत मोठी अपडेट दिली आहे. 

बॉलिवूडचा खिलाडी कुमार त्याच्या आगामी 'वेलकम टू द जंगल' या सिनेमामुळे चर्चेत आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या वेलकम या सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. वेलकम आणि वेलकम बॅक या चित्रपटांनंतर प्रेक्षकांना 'वेलकम ३'ची प्रतीक्षा होती. आता अखेर या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयने शूटिंगदरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत सिनेमाबाबत मोठी अपडेट दिली आहे. 

ऑगस्ट महिन्यात 'वेलकम ३'ची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सिनेमाचं पोस्टर आणि टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. अक्षय कुमारने 'वेलकम ३'च्या सेटवरील एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अर्शद वारसी आणि अक्षय कुमार सिनेमातील एक सीन शूट करत असल्याचं दिसत आहे. 

"वेलकम टू द जंगल शूटिंग सुरू करताच मस्तीलाही सुरुवात झाली आहे. हा मजेशीर  रोलरकोस्टरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे," असं अक्षयने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत 'वेलकम ३'ची प्रतीक्षा करत असल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, 'वेलकम टू द जंगल' सिनेमात कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार, संजय दत्त, सुनिल शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटनी, लारा दत्ता हे कलाकार या सिनेमात झळकणार आहेत.  डिसेंबर २०२४मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारवेलकम होमअर्शद वारसीसेलिब्रिटी