Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरभाडे थकवल्याने आदित्य पांचोलीला बंगला सोडावा लागणार

By admin | Updated: October 6, 2015 12:57 IST

प्रति महिना १५० रुपये भाडे असलेल्या जुहूतील बंगल्याचे भाडे थकवल्याने अभिनेता आदित्य पांचोलीवर घर सोडण्याची वेळ ओढावली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ -  प्रति महिना १५० रुपये भाडे असलेल्या जुहूतील बंगल्याचे भाडे थकवल्याने अभिनेता आदित्य पांचोलीवर घर सोडण्याची वेळ ओढावली आहे. मुंबई हायकोर्टाने जुहूतील बंगला खाली करण्याचे आदेश दिले असून आता या विरोधात पांचोली सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर पांचोलींना हा बंगला खाली करावा लागणार आहे. 

अभिनेता आदित्य पांचोली व त्याचे कुटुंबीय जुहूतील इस्कॉन मंदिराजवळील बंगल्यात राहत असून हा बंगला पांचोलींनी १९६० मध्ये भाडेतत्वावर घेतला होता. १५० रुपये प्रति महिना असे या बंगल्याचे भाडे होते. १९७८ मध्ये पांचोलीनी घराचे तीन महिन्याचे भाडे थकवल्याने घरमालकाने त्यांना नोटीस बजावली होती. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ हा वाद कोर्टात आहे. मुंबई हायकोर्टाने नुकताच या प्रकरणावर निकाल दिला आहे. घरातील वास्तव्य कायम ठेवण्यासाठी पांचोली कुटुंबाने केलेले सर्व दावे हायकोर्टाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे हा बंगला सोडण्याची नामुष्की पांचोली कुटुंबावर ओढावली आहे.