Join us  

'मी मालिका सोडली नाही, मला काढून टाकलं होतं'; मराठी मालिकेविषयी उर्मिला निंबाळकरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 2:31 PM

Urmila nimbalkar: आज उर्मिला प्रसिद्ध कन्टेंट क्रिएटर, एक यशस्वी युट्यूबर म्हणून ओळखली जाते. परंतु, एकेकाळी तिनेही अनेक नकार पचवले आहेत.

युट्यूबवरचं प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव म्हणजे उर्मिला निंबाळकर (urmila nimbalkar). उत्तम मराठी अभिनेत्री असलेल्या उर्मिलाने युट्यूबवर मराठी कन्टेंट तयार करुन प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. परंतु, हा प्रवास सुरु करण्यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे. परंतु, तिच्या करिअरमध्ये अशी एक मालिका आली ज्यातून तिला चक्क काढून टाकण्यात आलं होतं. याविषयी नुकताच तिने खुलासा केला आहे. इतकंच नाही तर तो काळ तिच्यासाठी किती कठीण गेला हे सुद्धा तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

आज उर्मिला प्रसिद्ध कन्टेंट क्रिएटर, एक यशस्वी युट्यूबर म्हणून ओळखली जाते. परंतु, एकेकाळी तिनेही अनेक नकार पचवले आहेत. परंतु, या सगळ्यात एक नकार तिच्या जिव्हारी लागणारा होता. कारण, एका गाजलेल्या मालिकेतून तिला अचानकपणे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे या विषयी पहिल्यांदाच उर्मिला उघडपणे बोलली आहे. उर्मिलाच्या युट्यूब चॅनेलने नुकताच १ मिलिअनचा टप्पा गाठला त्यानिमित्ताने तिने एक व्हिडीओ शेअर करत तिचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे.

उर्मिला निंबाळकरने धुडकावली Bigg boss marathi ची ऑफर; 'या' कारणामुळे दिला शोला नकार

"एके दिवशी मी मालिकेच्या सेटवर गेले आणि माझ्या मेकअप रुपममध्ये गेले. पण, तिथे गेल्यावर कोणी माझा मेकअपच करत नव्हता. मेकअप दादा इकडे-तिकडे पळत होते. कोणी माझ्याशी नीट बोलत सुद्धा नव्हतं. नेमकं काय सुरु आहे हे माझं मलाच कळत नव्हतं. सगळे एकमेकांवर ढकलत होते. मग प्रोडक्शनमधून एक मुलगी आली आणि तिने मला सांगितलं की, चॅनेलने मला मालिकेतून काढून टाकलंय. त्यावेळी मला इतकं शून्य फिलिंग आलं होतं ना. मला तेव्हा असं वाटलं की मी खूप शून्य आहे. फेल्युअर आहे. माझ्याहून शून्य किंमत या जगात कोणाचीच नाहीये असं मला वाटायला लागलं. कारण, मी माझ्या आयुष्यातलं सगळं खर्ची केलं होतं. माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी गमावल्या होत्या", असं उर्मिला म्हणाली.

'तो मला आतल्या खोलीत घेऊन गेला आणि..'; मराठी अभिनेत्रीने सांगितला ऑडिशनचा धक्कादायक अनुभव

पुढे ती म्हणते, "त्यानंतर एक गाडी आली आणि त्यांनी मला प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये नेलं. तिथे गेल्यावर तू सारखी आजारी पडतेस, तुझे हेल्थ इश्यू आहेत. त्यामुळे तू स्वत:हून मालिका सोडतीयेस असं माज्याकडून लिहून घेतलं. जे घडतंय ते चुकीचं आहे हे मला कळत होतं. पण, त्यावेळी मी इतकी दु:खात होते, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स करुन मी एवढी थकले होते की आपल्याबरोबर सगळ्या वाईट गोष्ट होत असतील तर ते सगळं बंद व्हाव, असं आपलं शरीर आपल्याला सांगत असतं. त्यामुळे हे माझ्यासाठी चांगलं असेल असा विचार करून मी त्यावर सह्या केल्या. यात माझ्या खूप गोष्ट गेल्या. माझे पैसे गेले. आजही मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही कारण मी त्यावर सही केली आहे".

"मला मालिकेतून काढून टाकल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की, मी मालिका सोडली. पण, खरं तर मला काढून टाकण्यात आलं होतं हे कोणालाच माहित नव्हतं. त्यानंतरही मी टॅन्ट्रम्स फेकायची म्हणून काढलं आहे असंही म्हटलं जायचं”, असंही तिने सांगितलं.  दरम्यान, उर्मिला २०१६ मध्ये स्टार प्रवाहवरील दुहेरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता संकेत पाठक स्क्रीन शेअर करत होता. मात्र, त्यानंतर अचानकपणे उर्मिलाला या मालिकेतून काढलं आणि तिच्याजागी सुपर्णा श्याम हिला उर्मिलाची भूमिका ऑफर झाली. 

टॅग्स :उर्मिला निंबाळकरटेलिव्हिजनसेलिब्रिटी