मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अभिनयाचा वेगळा असा ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री नयनतारा यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता वांद्रे रेक्लमेशन येथील थायलंड कोर्ट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात मुलगा दीपेश आहे. गेल्या ८ वर्षांपासून नयनतारा यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. शिवाय तीन वर्षांपासून त्यांच्यावर नायर रुग्णालयात डायलेसिस सुरु होते. ठाणे येथील राहत्या घरी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली. त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत सुधीर जोशी यांच्यासह नयनतारा यांची जोडी कमालीची गाजली. कारटी प्रेमात पडली अशा अनेक नाटकांसह अशी ही बनवाबनवी, सगळीकडे बोंबाबोंब, बाळा गाऊ कशी अंगाई, अशा अनेक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील लीलाबाई काळभोर ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्या काळी चांगलीच गाजली होती. सहारा चॅनलवरील गिल्ली डंडा या मालिकेतही त्यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली होती. (प्रतिनिधी)
अभिनेत्री नयनतारा यांचे निधन
By admin | Updated: December 1, 2014 02:39 IST