Join us  

 एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा...; 'या' कारणाने चिन्मयी सुमित संतापली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 3:32 PM

आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यात बंदच करून टाकाव्यात मराठी शाळा..., अशी Chinmayee Sumeetची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

आपली मुलं स्पर्धेत कुठेही मागं राहू नये, या ध्यासानं झपाटलेले पालक आपल्या मुलांना मोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतात. त्यासाठी लाखो रूपयांची फी देतात. परिणामी अनेक मराठी शाळांना अखेरची घरघर लागली आहे. दरवर्षी शेकडो मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. घरात मराठी बोललं जातं, पण मुलांना मराठी भाषेची ओळखचं नाही, हे चित्रही सर्रास दिसतंय. अभिनेत्री चिन्मयी सुमित (Chinmayee Sumeet) हिने नेमक्या याच गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे.

होय, चिन्मयीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीये आणि सोबत संतापही. आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यात बंदच करून टाकाव्यात मराठी शाळा..., अशी चिन्मयीची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

एका मराठी वाहिनीने आपल्या एका रिअ‍ॅलिटी शोचा  प्रोमो नुकताच शेअर केला. या प्रोमोत स्पर्धक आणि मराठी मुलांना मराठी आकडे समजत नाहीत, असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ तसा मजेदार आहे. पण तितकाच विचार करायला भाग पाडणारा आहे. हाच धागा पकडून चिन्मयीने पोस्ट लिहिली आहे.

ती लिहिते, ‘हे रील पाहून तुम्हाला कदाचित ,कदाचित कशाला हमखास हसू येणार आहे...पण हळू हळू असंच होणार आहे. मराठी आकडे, मराठी स्वर , व्यंजनं, मुळाक्षरं सारीच विस्मरणात जाणार आहेत. वेष कसा असावा, खावं प्यावं काय, कुणाचे पुतळे, कुणाचे जयजयकार, खरा इतिहास, खोटा इतिहास, चुकीचा इतिहास ह्यावर संस्कृतीचा ठेका घेऊन वादंग माजवणारे लोक मराठीबद्दल काहीच भूमिका का घेत नाहीत? इतका उबग आलाय आता. आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा...’

चिन्मयीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत आणि त्या कमेंट्सही खूप बोलक्या आहेत.

टॅग्स :चिन्मयी सुमीतफेसबुक