Join us

अभिनेता शशांक केतकरची 'कास्टिंग'बद्दलची पोस्ट चर्चेत, कमेंट करत कलाकारांनी मांंडली मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 14:35 IST

शशांकने चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या कास्टिंगबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

Shashank Ketkar: मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शशांक केतकर. शशांकने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. वेगवेगळे मराठी चित्रपट, नाटकं तसेच मालिकांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शशांक केतकर त्याच्या अभिनयासह बेधडक वक्तव्यामुळेसुद्धा अनेकदा चर्चेत येतो. नुकतंच अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

शशांकचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अशातच शशांकने चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या कास्टिंगबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. शशांकने फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत मराठी सिनेसृष्टीत लॉबी, गटबाजीला टोला लगावला आहे.  शशांकने लिहलं, "चित्रपटांच्या कास्टिंगचं लॉजिक काही कळत नाही. सीरियल करणारे अभिनेते खूप दिसतात म्हणून नकोत. फक्त  चित्रपट करणाऱ्यांना बुकिंगच नाहीये म्हणून नकोत. नवे चेहरे खूपच रिस्की, म्हणून नकोत", असं त्यानं म्हटलं. 

शशांकच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्यात. अभिनेत्री मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी मुकादम यांनी "आमच्यासमोर तर नेहमीच डायरेक्ट ट्रेलरच येतात. कास्टिंग कधी सुरु होतं ? कुठे ? ह्याबद्दल काही कळतच नाही. त्यातून आपण काही मिलियन इन्स्टा फॉलोअर्स असणारे नाही", अशी कमेंट केली. तर अभिनेता अतुल तोडणकरनं कमेंट करत लिहलं, "आपल्याकडे कास्टिंग होतच नाही.. जुळवाजुळव होते". यासोबतच अभिनेत्री संयोगिता भावे यांनीही "फिल्म साथी कास्टिंग होतच नाहीये. तुम्ही त्या खास ग्रुपमध्ये किंवा लॉबीमध्ये असल तर तुमचा चित्रपट साथी कास्टिंग होतं, असं म्हटलं. 

शशांकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं आजवर अनेक मालिका, चित्रपट व सीरिजमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. पण त्याने त्याच्या करिअरमधील बराचसा काळ हा टीव्हीवरील मालिकांमध्ये विविध भूमिका करत गाजवला आहे. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्री म्हणून सर्वांच्या घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. सध्या तो 'मुरांबा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

टॅग्स :शशांक केतकरमराठी अभिनेता