मुंबई : रस्त्यांवर झोपणाऱ्या बेघर लोकांबद्दल गायक अभिजित भट्टाचार्य यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्याचा बेघर अधिकार संघटनेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. माणसाला माणूस म्हणून कशी वागणूक द्यायची याची अभिजित भट्टाचार्य यांना माहिती नसल्याची टीका संघटनेचे अध्यक्ष ब्रिजेश आर्या यांनी केली आहे.आर्या म्हणाले की, घर विकत किंवा भाड्याने घेण्यासाठी पैसे नसल्याने नाइलाजास्तव बेघरांना रस्त्याशेजारी किंवा पदपथावर झोपावे लागते. मात्र त्याचा अर्थ त्यांची तुलना कुत्र्याशी करणे कधीच समर्थनीय नाही. अभिजित यांनी केलेल्या वक्तव्यात स्वत: स्ट्रगल करताना कधीच रस्त्यावर झोपले नसल्याचा खुलासा केला आहे. मात्र त्या वेळी त्यांच्याकडे घर भाड्याने घेण्याइतपत तरी पैसे होते. तसे नसेल, तर ते झोपले तरी कुठे यांचा खुलासा त्यांनी करावा. केईएम आणि टाटासारख्या नामांकित रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईकही रुग्णालयाबाहेरील पदपथावरच झोपतात. कोणतीही माहिती नसताना केवळ प्रसिद्धीसाठी प्रसिद्धीलोलुप कलाकारांनी अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करणे थांबवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
अभिजितच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध
By admin | Updated: May 8, 2015 02:04 IST