ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आता दिग्दर्शक-अभिनेता नागराज मंजुळेसोबत काम करणार असल्याची चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली आहे. एका नव्या प्रोजेक्टसाठी हे दोघं एकत्र येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आमीर खानने स्वतः 'फँड्री' आणि 'सैराट' हे नागराज मंजुळेचे सिनेमे आवडल्याचे सांगत त्याच्या कामाचे कौतुक केले होते. शिवाय ज्यावेळी 'सैराट' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला होता तेव्हा खुद्द आमीरने प्रेक्षकांना सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे आवाहनही केले. 'सैराट' सिनेमाने केवळ मराठी इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडमध्येही धुमाकूळ घातला आहे.
या सिनेमातील गाण्यांनी बॉलिवूडकरांनाही अक्षरशः याड लावले असून ते देखील यावर ठेका धरु लागले आहेत. एकूण नागराज मंजुळेच्या कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याने आता परफेक्शनिस्ट आमीरलाही नागराजसोबत काम करायचे असल्याची माहिती समोर येत आहे. एकूणच नागराज मंजुळेने आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानलाही 'याड' लावले, असे म्हटले जात आहे. दरम्यान 'सैराट' सिनेमातील संगीतकार अजय-अतुल या जोडीने आमीरसोबत 'पीके' सिनेमासाठी काम केले आहे.