Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉफी विथ करणमधील हा प्रश्न ऐकून आमिर खान आला टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:46 IST

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमात करण जोहर आमिर खानचे आभार मानताना दिसत आहे.

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. या कार्यक्रमाचा नव्या सिझनच्या पहिल्या भागात दीपिका पादुकोण आणि आलिया भट तर दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्या आयुष्यातील गुपिते जाणून घेता आली. कॉफी विथ करण या कार्यक्रमाचे पहिले दोन्ही भाग प्रेक्षकांना खूप आवडले असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला पाहायला मिळणार आहे. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमात करण जोहरआमिर खानचे आभार मानताना दिसत आहे. आमिर खान छोट्या पडद्यावर खूपच कमी वेळा आपल्याला हजेरी लावताना दिसतो. पण त्याने माझ्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात येण्यास होकार दिला यासाठी मी त्याचे आभार मानत असल्याचे करण या प्रोमोत बोलताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये आमिरसोबत आणखी एक सेलिब्रेटीदेखील पाहायला मिळत आहे. ही व्यक्ती म्हणजे दुसरी कोणीही नसून मलाईका अरोरा आहे. या कार्यक्रमात येऊन ती आमिरला काही प्रश्न विचारताना दिसणार आहे. मलाईकाने विचारलेला एक प्रश्नऐकून आमिर चांगलाच बुचकळ्यात पडला असल्याचे या प्रोमोत दिसत आहे. कारण सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यामध्ये एकाची निवड करायला मलाईका त्याला सांगत आहे. या प्रश्नावर आता आमिर काय उत्तर देतो हे प्रेक्षकांना कॉफी विथ करण या कार्यक्रमातच पाहायला मिळणार आहे. 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असून या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आलिया भट-दीपिका पादुकोण, अक्षय कुमार-रणवीर सिंग, आमिर खान यांच्यानंतर आता जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर, सारा अली खान-सैफ अली खान, वरूण धवन- कॅटरिना कैफ यांसारखे सेलिब्रेटी कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.  

 

टॅग्स :कॉफी विथ करण 6आमिर खानमलायका अरोराकरण जोहर