नवी दिल्ली - बांगलादेशातील मोहम्मद युनूस सरकार त्यांच्या देशातीलच २ प्रसिद्ध अभिनेत्री मेहर अफरोज शॉन आणि सोहना सबा यांच्या टीकेमुळे संतापली आहे. बांगलादेश सरकारला अभिनेत्रींनी केलेली टीका सहन झाली नाही. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेच्या पोलिसांना सूचना देत या दोन्ही अभिनेत्रींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सरकारविरोधात उठणारे आवाज दाबवण्यासाठी मोहम्मद युनूस सरकारने ऑपरेशन डेविल हंड सुरू केले आहे. त्यात राजकीय विरोधकांना टार्गेट केले जात आहे. आतापर्यंत या मोहिमेतंर्गत १५०० लोकांना सरकारने ताब्यात घेतले आहे. त्या सर्वांची पोलीस आणि गुत्पचर यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांच्या यादीत बहुतांश आवामी लीगचे नेते आहेत. बांगलादेशातील गृह मंत्रालयाचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांनी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी जोडला आहे.
जहांगीर आलम चौधरी म्हणाले की, डेविलचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ शत्रूची ताकद जे लोक देशाला अस्थिर करतात. कायदा मोडतात, गु्न्हेगारी कारवायांमध्ये समाविष्ट असतात. या ऑपरेशनमध्ये त्या लोकांना टार्गेट करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितले. युनूस सरकारने असाच आरोप करत बांगलादेशातील २ अभिनेत्री मेहर अफरोज, सौहाना सबा यांना त्यांच्या राहत्या घरातून अचानक ताब्यात घेण्यात आले. मेहर अफरोजला अधिकाऱ्यांनी धनमंडी लेनमधील त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. अफरोजविरोधात देशाविरोधात कट रचल्याचा आरोप करत ताब्यात घेतले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.
मेहर अफरोजचं फेसबुक पेज पाहिले तर ती मोहम्मद युनूस सरकार आणि त्यांच्या धोरणांवर उघडपणे टीका करते. मेहरचे वडील आवामी लीगचे नेते होते. अलीकडेच बांगलादेशात झालेल्या हिंसक आंदोलनात मेहर अफरोज यांच्या वडिलांचे घर जाळण्यात आले. मेहर अफरोज ही एक अभिनेत्री असून बांगलादेशी सिनेमात पार्श्वगायिका म्हणूनही तिने योगदान दिले आहे. मेहर अफरोजची चौकशी करतानाच बांगलादेश पोलिसांनी अभिनेत्री सोहना सबा हिला गुरुवारी रात्री १ च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. सोहनावरही देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे.