Join us

१६वं वरीस...बायोपिकचं!

By admin | Updated: December 25, 2016 04:07 IST

२०१६ हे वर्ष संपत आले आहे. या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘दंगल’ हा चित्रपट रिलीज होतोय. यात आमिर खान ‘कुस्ती’ या खेळातील पुरुषांची मक्तेदारी

- Virendrakumar Jogi 

२०१६ हे वर्ष संपत आले आहे. या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘दंगल’ हा चित्रपट रिलीज होतोय. यात आमिर खान ‘कुस्ती’ या खेळातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढताना दिसतोय. यासाठी तो आपल्या मुलींना कुस्तीच्या आखाड्यात उतरवितो. आपल्या मुलींनी आॅलिम्पिक गोल्ड मेडल मिळवावे, अशी त्याची महत्त्वाकांक्षा आहे. दंगल या चित्रपटाची कथा कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. २०१६ सालचा पहिला सुपरहिट चित्रपट बायोपिक होता. या वर्षी तब्बल १२ बायोपिक रिलीज झाले, बहुतांश चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धमाल केली. तर, दंगल हा या वर्षी प्रदर्शित होणारा तेरावा बायोपिक ठरणार आहे.नीरजा : राम माधवानीदिग्दर्शित सोनम कपूर हिची प्रमुख भूमिका असलेला ‘नीरजा’ हा चित्रपट नीरजा भानोत या एअरहोस्टेस्टच्या जीवनावर आधारित होता. एअर इंडियाच्या विमानाला दहशतवादी हायजॅक करतात. यादरम्यान नीरजा विमानातील प्रवाशांना वाचवण्याची जबाबदारी उचलते अशी ही कथा आहे. धाडसी नीरजाची कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी आहे. नीरजा भानोत हिने आपल्या जिवाची आहुती देत ३५९ प्रवाशांचे जीव वाचविले होते. नीरजा भानोतचा भारत सरकारने अशोक चक्र प्रदान करून सन्मान केला होता. ‘नीरजा’ या चित्रपटासाठी सोनमला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अलीगड : हंसल मेहतादिग्दर्शित व मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेला अलीगढ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. या चित्रपटातून अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधील प्राध्यापक श्रीनिवास रामचंद्र सिरीस यांची कथा दाखविण्यात आली होती. लैंगिक कारणांमुळे या प्राध्यापकाला निलंबित करण्यात येते. यात मनोज वायपेयी याने प्राध्यापकाची, तर राजकुमार राव याने पत्रकाराची भूमिका साकारली होती. अलीगढ या चित्रपटासाठी मनोज वाजपेयीला गौरविण्यात आले.

अजहर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहमंद अजहरुद्दीन याच्या जीवनावर टोनी डिसूझा दिग्दर्शित अजहर हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला. इम्रान हाश्मी याने मोहम्मद अजहरुद्दीनची भूमिका साकारली होती. पर्दापणातच सलग तीन शतके झळकावत हैदराबादच्या मोहम्मद अजहरुद्दीनने शिखर गाठले. अजहरचे खासगी आयुष्य, क्रिकेटपटू म्हणून मिळविलेले यश आणि मॅच फिक्सिंगचा आरोप व त्यातून सुटका हे सर्व या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. इमरान हाश्मीचा अभिनय ही या चित्रपटाची उजवी बाजू ठरली होती.

वीरप्पन : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन याचा बायोपिक रामगोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अभिनेता संदीप भारद्वाज याने वीरप्पनची भूमिका साकारली होती. सचिन जोशी, लिसा रे, उषा जाधव यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. वीरप्पनबद्दल बरीच माहिती व क्रूर चेहऱ्यामागील एका व्यक्तीचे गुण दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॉक्स आॅफिसवर जरी या चित्रपटाला यश मिळाले नसले, तरी त्याची मीडियात बरीच प्रशंसा झाली होती. समीक्षकांनी संदीप भारद्वाजच्या अभिनयासह या चित्रपटाचे कौतुक केले.

सरबजीत : १९९० साली चुकीने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करणारा पंजाबचा शेतकरी सरबजीतसिंग याच्या जीवनावर आधारित ओमंग कुमारदिग्दर्शित सरबजीत हा चित्रपट याच वर्षी रिलीज झाला. सरबजीतच्या सुटकेसाठी त्याची बहीण दलबीर कौर हिने केलेला प्रयत्न या चित्रपटातून दाखविण्यात आला होता. या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय-बच्चन व रणदीप हुड्डा यांनी चांगलीच मेहनत घेतली होती. बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट हिट ठरला. समीक्षकांनी रणदीप हुड्डा व ऐश्वर्या राय यांच्या अभिनयाची प्रशंसा केली.

बुधिया सिंग-बॉर्न टू रन : जगातील वयाने सर्वांत लहान मॅरेथॉन धावपटू म्हणून एके काळी संपूर्ण जगात प्रसिद्धी पावलेल्या बुधिया सिंगच्या जीवनावर आधारित ‘बुधिया सिंग - बॉर्न टू रन’ या चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला. सौमेंद पाधीदिग्दर्शित या चित्रपटात मनोज वाजपेयी प्रशिक्षक बिरांची दासच्या भूमिकेत असून, बालकलाकार मयूरने बुधिया सिंगचे पात्र साकारले आहे. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नसले, तरीदेखील चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

रुस्तम : भारतीय नौदल अधिकारी के. एम. नानावटी यांच्या जीवनावर या रुस्तम या चित्रपटाची कथा आधारित आहे. हा चित्रपट बायोपिक नसून कोर्टरूम ड्रामा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नानावटी हत्या प्रकरणावर (नौदल अधिकारी कवस नानावटीने पत्नीचा प्रियकर प्रेम अहुजा याची केलेली हत्या) आधारित रुस्तम पावरी ही भूमिका असल्याचे अनेकांचे मत आहे. टिनू देसाईदिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमारने यात रुस्तम पावरी ही भूमिका साकारली होती. ईशा गुप्ता व इलियाना डिक्रूझ यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला.

‘एमएस धोनी - अनटोल्ड स्टोरी’ : सुशांतसिंह राजपूत याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर आधारित ‘एमएस धोनी : अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे कौतुक झाले. दिग्दर्शक नीरज पांडेदिग्दर्शित या चित्रपटात सुशांतसिंह राजपूतने चांगलीच मेहनत घेतली होती. विशेषत: धोनीचा फेव्हरेट हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी त्याला चांगलाच घाम गाळावा लागला होता. किरण मोरे यांनी सुशांतला क्रिकेटचे धडे दिले होते. सुशांतने धोनीची स्टाईल हुबेहूब आत्मसात केली. सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक म्हणून सध्या ‘एमएस धोनी : अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा उल्लेख केला जातो.

अण्णा : किसन बाबूराव हजारे : सामाजिक कार्यकर्ते व भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभरात आंदोलन करणारे अण्णा हजारे यांच्या जीवनावर आधारित ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ हा चित्रपट याच वर्षी रिलीज झाला. या चित्रपटाची फार चर्चा झाली नाही. मात्र, समीक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली. या चित्रपटातून भारतीय सैन्यातील किसन हजारे नावाचा एक जवान गावात परत आल्यावर सामाजिक क्रांती घडवून अण्णा हजारे कसा होतो, याचे चित्रण करण्यात आले आहे. शशांक उदापूरकर यांनी अण्णा हजारे यांची भूमिका साकारली होती.

रिबिलीअस फ्लॉवर : २०१६मध्ये बायोपिक म्हणून ‘रिबिलीअस फ्लॉवर’ या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. आध्यात्मिक गुरू रजनीश ओशो यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात प्रिन्स शाह, शशांक सिंग, मंत्रा, इंदल सिंग, कीर्ती अदकर यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचा चाहता एक खास वर्ग असल्याने त्याची फारशी चर्चा झाली नाही. मात्र, अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत रिबिलिअस फ्लॉवर्सची वर्णी लागली.