Join us

अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

By नामदेव मोरे | Updated: July 6, 2025 23:04 IST

नवी मुंबईत कला दालन उभारण्याचेही आश्वासन

नवी मुंबई : अशोक सराफ ही महाराष्ट्राची शान व कला क्षेत्राचा कोहीनूर आहे. अभिनयाचे चालते बोलते विद्यापिठ असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत. आपण अक्षरे वाचतो पण ती पाहणेही आनंददायी असते हे अच्युत पालव यांनी दाखवून दिले असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्यावतीने ऐरोलीत पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अशोक सराफ व अच्युत पालव यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारच्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देता आला. जय जय महाराष्ट्र माझाला महाराष्ट्र गीताचा दर्जा देता आला. मराठी भाषा व कलेसाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण देताना सत्कार करता आला व आता पद्मश्री दिल्यानंतरही सत्कार होत आहे. त्यांच्याकडून अभिनय सेवा घडत जावो व पद्मभुषण, पद्मविभुषण सारखे पुरस्कारही मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सुलेखनकार अच्युत पालव यांनी अक्षरांची श्रीमंती दाखवून दिली. नवी मुंबईत कलादालन असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लवकरच कलादालन तयार करण्यासाठीचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.            सत्कार सोहळ्याचे आयाेजक व नाष्ट्य परिषदेचे नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी ऐरोलीमधील नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही सत्कार मुर्तींनी यावेळी सन्मानासाठी ऋण व्यक्त केले. अभिनेते प्रशांत दामले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोवीकाळात कलाकरांना केलेल्या मदतीला उजाळा दिला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, अभिनेत्री निवेदीता सराफ, अजीत भुरे, ममीत चौगुले, अनिकेत म्हात्रे, रामअशीष यादव, विजय माने, सरोज पाटील, रोहीदास पाटील उपस्थित होते.

कलाकारांच्या घरांचा प्रश्न सोडविणार

अभिनेते प्रशांत दामले यांनी बॅकस्टेज आर्टीस्टच्या घरांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.बँकस्टेज आर्टीस्टच्या या प्रश्नांवर लक्ष दिले जाईल व लवकरच तो मार्गी लावला जाईल असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्रात जन्म झाला हे माझे भाग्य. येथील प्रेक्षक सुजाण आहे, त्यांनी सदैव कामाचे कौतुक केले. ऐरोलीकरांनी जो भव्य सत्कार केला तेवढा भव्य सत्कार यापुर्वी कधीच झाला नव्हता. हा प्रसंग सदैव लक्षात राहील - अशोक सराफ, अभिनेते

मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये कलाकारांना खूप वेटींगवर रहावे लागते. मुंबईप्रमाणे नवी मुंबईमध्ये कलादालन व्हावे ही अपेक्षा आहे. शाळेत सुर झालेला अक्षरांचा प्रवास पद्मश्रीपर्यंत पोहचला याचा आनंद आहे - अच्युत पालव, सुलेखनकार

टॅग्स :अशोक सराफएकनाथ शिंदेनवी मुंबई