Join us  

मिर्झापूरवरून वाढला वाद, खासदार अनुप्रिया पटेल यांना 'कालीन भैया' पंकज त्रिपाठीचं उत्तर....

By अमित इंगोले | Published: October 31, 2020 10:00 AM

काही दिवसांपूर्वी मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल म्हणाल्या होत्या की, या वेबसीरीजच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दोन वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर लोकप्रिय वेबसीरीज 'मिर्झापूर २' नुकतीच रिलीज झाली आहे. प्रेक्षकांना या वेबसीरीजचा दुसरा सीझनही चांगलाच आवडलाय.  पण सोबतच दुसरा सीझन वादातही सापडला आहे. काही दिवसांपूर्वी मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल म्हणाल्या होत्या की, या वेबसीरीजच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता या वेबसीरीजमध्ये कालीन भैयाची भूमिका साकारणारा अभिनेता पंकज त्रिपाठी याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाल्या होत्या अनुप्रिया पटेल?

अनुप्रिया पटेल ट्विट करत म्हणाल्या होत्या की, 'माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्रीजी यांच्या नेतृत्वात मिर्झापूरचा विकास होत आहे. हे समरसतेचं केंद्र आहे. मिर्झापूर नावाच्या वेबसीरीजच्या माध्यमातून हे ठिकाण हिंसक असल्याचं दाखवत बदनाम केलं जात आहे. या सीरीजच्या माध्यमातून चुकीचा संदेश पसरवला जात आहे'. अनुप्रिया पटेल यांनी एका दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले होते की, 'मिर्झापूर जिल्ह्याची खासदार असण्याच्या नात्याने माझी मागणी आहे की, याची चौकशी झाली पाहिजे आणि या विरोधात कारवाई झाली पाहिजे'. (मिर्झापूर वेबसीरीज म्हणजे 'UP चा गेम ऑफ थ्रोन्स', कसा ते फॅन्सने ट्विटरवर सांगितलं समजावून....)

काय म्हणाला पंकज त्रिपाठी?

पंकज त्रिपाठीने या वादावर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने डीएनएसोबत बोलताना सांगितले की, 'प्रत्येक एपिसोडच्या सुरूवातीला एक डिस्क्लेमर येतं ज्यात लिहिलं असतं की, मिर्झापूर ही एक काल्पनिक कथा आहे आणि याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा जागेशी संबंध नाही. मी एक कलाकार आहे आणि याबाबत यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही. सोबतच मला हेही सांगायचं आहे की, मिर्झापूर सीरीजमध्ये जर क्रिमिनल आहेत तर यात एक रामाकांत पंडीतसारखा हिरोही आहे. ज्याला शहरासाठी चांगलं कामही करायचं आहे'. (भौकाल! मिर्झापूर २ रिलीज होताच फॅन्सची उडाली झोप, पहिल्या दिवशीच मीम्सचा धुमाकूळ...)

मिर्झापूरची जबरदस्त कास्ट

मिर्झापूर २ मध्ये पंकज त्रिपाठीशिवाय अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, राजेश तेलंग, रसिका दुग्गल,  लिलीपुट, कुलभूषण खरबंदा यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. आता या लोकप्रिय सीरीजच्या तिसऱ्या सीझनची तयारीही सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण बाकीचे डिटेल्स अजून समोर आलेले नाहीत. 

टॅग्स :पंकज त्रिपाठीमिर्झापूर वेबसीरिज