Join us

झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:36 IST

Zomato Eternal Share : झोमॅटोची मूळ कंपनी इटरनल लिमिटेडने टाटा समुहातील मोठमोठ्या कंपन्यांना मागे टाकलं आहे. एवढेच नाही तर अदानींच्या कंपनीलाही धोबीपछाड दिला आहे.

Zomato Eternal Share : तुमच्या एका क्लिकवर जेवण आणि किराणा सामान पोहोचवणाऱ्या झोमॅटो अर्थात इटरनल लिमिटेडने मोठी झेप घेतली आहे. कंपनीचे बाजार भांडवल वाढून आज ३.१३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या विक्रमासह इटरनल लिमिटेडने टाटा समूहातील दिग्गज कंपन्या टाटा मोटर्स आणि टायटनलाही मार्केट कॅपच्या बाबतीत मागे टाकले आहे. या मोठ्या यशासह इटरनल कंपनी टॉप २५ निफ्टी ५० शेअर्सच्या यादीत सामील झाली आहे. आज दुपारी २:४० वाजता इटरनलचा शेअर १.२४% च्या वाढीसह ३२७ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

बाजार भांडवलाची तुलना..

  1. इटरनल (झोमॅटो): ३.१३ लाख कोटी रुपये
  2. टाटा मोटर्स: २.६४ लाख कोटी रुपये
  3. टायटन: ३.१२ लाख कोटी रुपये

इटरनलने केवळ टायटनलाच नाही, तर अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी एंटरप्रायझेस, पॉवर ग्रिड, विप्रो आणि कोल इंडिया यांसारख्या अनेक दिग्गज कंपन्यांनाही मागे टाकले आहे.

पुढील क्रमांक कोणाचा?अपेक्षेनुसार, इटरनल लवकरच संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ३.२२ लाख कोटींच्या मार्केट कॅपला मागे टाकू शकते. याशिवाय कंपनीच्या पुढील लक्ष्यांमध्ये एनटीपीसी (३.२५ लाख कोटी) आणि बजाज फिनसर्व्ह (३.३० लाख कोटी) या कंपन्यांचाही समावेश आहे.

ब्लिंकिटमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढलाझोमॅटोचे सीईओ दीपेंदर गोयल यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीचा शेअर त्याच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी (१८९ रुपये) पासून जवळपास ७२% नी वाढला आहे. या तेजीमागे कंपनीची उपकंपनी ब्लिंकिट हे प्रमुख कारण मानले जात आहे. ब्लिंकिटच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कंपनीच्या महसुलात मोठी वाढ होत असून, यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील दीर्घकालीन विश्वास अधिक मजबूत झाला आहे.

 

 

गुंतवणूकदारांना मिळालेला परतावा

  • २०२५ या वर्षात: १७%
  • गेल्या ६ महिन्यांत: ६१%
  • गेल्या ३ महिन्यांत: २८%
  • गेल्या १ महिन्यात: २%

झोमॅटोच्या या कामगिरीने फूड डिलिव्हरी सेक्टरमध्ये कंपनीचे मजबूत स्थान सिद्ध केले आहे, ज्यामुळे भविष्यातही तिच्या वाढीची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :झोमॅटोशेअर बाजारटाटाअदानी