Join us

शेअर बाजाराचे उद्या काय होणार? इस्रायल हट्टालाच पेटला; इराणवर हल्ला झाला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 20:17 IST

Israel -Iran War, Share Market Collapse: जर इस्रायलने हल्ला केला तर जागतिक बाजारात तणावात वाढ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलासह अन्नधान्य, पदार्थ आणि अनेक गोष्टींच्या आयात-निर्यातीवर परिणाम होणार आहे.

कधी नव्हे तो ७५ हजार पार गेलेला शेअर बाजार गेल्या काही दिवसांपासून कोसळायला लागला आहे. याचे कारण आहे ते म्हणजे इराण-इस्रायल युद्धाचे जमा झालेले ढग. यामुळे गुंतवणूकदार भितीच्या छायेखाली आहेत. शेअर बाजार वेगाने कोसळत असल्याने अनेकांनी तुफान नफेखोरी केली आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे बडे अधिकारी मारले गेल्याने इराणनेही मिसाईलचा वर्षाव करत प्रत्यूत्तर दिले होते. आता इस्रायल पुन्हा इराणवर हल्ला करण्याची तयारी करत आहे. 

आता जर इस्रायलने हल्ला केला तर जागतिक बाजारात तणावात वाढ होणार आहे. यामुळे कच्च्या तेलासह अन्नधान्य, पदार्थ आणि अनेक गोष्टींच्या आयात-निर्यातीवर परिणाम होणार आहे. कच्चे तेल महागणार आहे, तर अन्न धान्यही महागणार आहे. एवढेच नाही तर इस्रायलने हल्ला केला तर युद्धाची शक्यताही वाढणार आहे. यामुळे जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होणार आहे. 

इस्रायलच्या हल्ल्यामुळे युद्ध भडकले तर शेअर बाजार कोसळण्याची शक्यता अधिक आहे. ईराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने वेळ आल्यावर जोरदार प्रत्यूत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पाच सदस्यीय युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यामध्ये इराणला जोरदार प्रत्यूत्तर देण्याची चर्चा करण्यात आली. परंतु योग्य वेळेची वाट पाहण्याचेही ठरविण्यात आले आहे. 

याची खबर लागताच 75,124.28 वर गेलेला भारतीय शेअर बाजार दोन हजार अंकांनी कोसळून 72,943.68 वर आला आहे. तर निफ्टी 22,775.70 वरून 22,147.90 वर आला आहे. हल्ले असेच सुरु राहिले तर शेअर बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, असे तज्ञांचे मत आहे.  

टॅग्स :इस्रायलइराणशेअर बाजारयुद्ध