Join us
Daily Top 2Weekly Top 5

Stock Market Today: शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स ६९० अंकांनी कोसळला, निफ्टीचीही २४ हजारांखाली घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:20 IST

Stock Market Today 11 May, 2026: जागतिक राजकारणातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेली चिंता, याचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला.

Stock Market Today 11 May, 2026: जागतिक राजकारणातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेली चिंता, याचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी बाजाराने मोठ्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. बीएसई (BSE) सेन्सेक्स ६९०.१ अंकांच्या मोठ्या घसरणीसह ७६,६३८.०९ वर उघडला, तर एनएसई (NSE) निफ्टी ५० निर्देशांक देखील २०५.९ अंकांच्या नुकसानीसह २४,००० च्या खाली म्हणजेच २३,९७०.१० अंकांवर उघडला. मागील आठवड्यातील शुक्रवारी देखील बाजार रेड झोनमध्ये बंद झाला होता, त्यावेळी सेन्सेक्स ५१६ तर निफ्टी १५० अंकांनी घसरला होता.

बाजारातील सर्वच प्रमुख क्षेत्रांत पडझड

आजच्या व्यवहाराची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिली. सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २७ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणीत उघडले, तर फक्त २ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. एनटीपीसीचा शेअर मात्र कोणताही बदल न होता स्थिर उघडला. निफ्टी ५० ची स्थितीही अशीच होती; तेथील ५० पैकी ४४ कंपन्यांचे शेअर्स घसरले असून केवळ ६ शेअर्स तेजीसह उघडले. टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सुरुवातीला सर्वाधिक ०.२३ टक्क्यांची किरकोळ वाढ दिसली, तर दुसरीकडे टायटनचा शेअर ३.८१ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह उघडला.

Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन

कंपन्यांच्या शेअर्सची स्थिती

सोमवारच्या या घसरणीचा फटका अनेक दिग्गज कंपन्यांना बसला आहे. टायटन व्यतिरिक्त इंडिगो ३.१४ टक्के, एसबीआय ३.०० टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.०१ टक्के आणि मारुति सुझुकी १.९८ टक्क्यांनी घसरून उघडले. बँकिंग क्षेत्रातील एचडीएफसी बँक १.४७ टक्के, ॲक्सिस बँक ०.९४ टक्के आणि आयसीआईसीआय बँक ०.६१ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.

रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एलअँडटी, बजाज फायनान्स आणि अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही १ टक्क्याच्या आसपास घसरले. आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस आणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्समध्येही किरकोळ घसरण पाहायला मिळाली. या सर्व नकारात्मक वातावरणात केवळ एचसीएल टेकच्या शेअरमध्ये ०.१२ टक्क्यांची वाढ दिसून आली. 

एकूणच, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून, त्याचा परिणाम आज बाजारातील मोठ्या विक्रीत दिसून आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock market crashes on 'Black Monday'; Sensex plunges 690 points.

Web Summary : Indian stock market faced a significant downturn due to global tensions and rising crude oil prices. Sensex fell by 690 points, and Nifty also declined below 24,000, with most sectors experiencing losses. Investors are worried about crude oil prices and global conditions.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा