Join us

अर्शद वारसी अडचणीत! 'पंप अँड डंप' प्रकरणात सेबीची मोठी कारवाई, पत्नीचाही सहभाग उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:26 IST

SEBI Action on Arshad Warsi: सेबीने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी आणि त्यांची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यासह इतर ५७ संस्थांना शेअर बाजारात व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.

SEBI Action on Arshad Warsi : शेअर बाजाराचे नियामक सेबी (SEBI) म्हणजेच 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया'ने एक मोठी कारवाई केली आहे. बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि इतर ५७ संस्थांना १ ते ५ वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमधून (शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापासून) बंदी घातली आहे. 'साधना ब्रॉडकास्ट' (Sadhana Broadcast, आता क्रिस्टल बिझनेस सिस्टम लिमिटेड) च्या शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची युट्यूब चॅनेलद्वारे दिशाभूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अर्शद-मारियावर बेकायदेशीर कमाईचा आरोप, दंडही ठोठावला!सेबीच्या तपासात असे समोर आले आहे की, अर्शद वारसी आणि त्यांच्या पत्नीने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची दिशाभूल करून लाखो रुपयांची बेकायदेशीर कमाई केली. या योजनेतून अर्शद वारसीला ४१.७० लाख रुपये, तर त्यांच्या पत्नीला ५०.३५ लाख रुपये नफा झाल्याचं सेबीने म्हटलं आहे. या प्रकरणी दोघांनाही प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सेबीने साधना ब्रॉडकास्टच्या प्रवर्तकांसह इतर ५७ संस्थांवर ५ लाख ते ५ कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारला आहे. या सर्वांनी मिळून ५८.०१ कोटी रुपये बेकायदेशीरपणे कमावले असून, आता त्यांना हे पैसे १२ टक्के व्याजासह परत करावे लागतील, असे सेबीने स्पष्ट केले आहे.

'पंप अँड डंप' स्कीमचा खेळसेबीच्या १०९ पानांच्या अहवालातून या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार आणि त्यांची कार्यपद्धती समोर आली आहे. गौरव गुप्ता, राकेश कुमार गुप्ता आणि मनीष मिश्रा हे या ऑपरेशनचे मुख्य सूत्रधार होते, असे सेबीने म्हटले आहे. साधना ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळातील सुभाष अग्रवाल यांनी मनीष मिश्रा आणि प्रवर्तकांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावली.

या लोकांनी मिळून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी एक योजना आखली होती. यामध्ये 'पंप अँड डंप स्कीम'चा वापर करण्यात आला, जिथे दोन टप्प्यांत हे काम झाले.

  • पहिला टप्पा: प्रवर्तकांशी संबंधित गुंतवणूकदार आपापसात शेअर्सचा व्यापार करत होते. यामुळे शेअरची किंमत हळूहळू वाढत गेली, कारण शेअरची तरलता (Liquidity) कमी होती.
  • दुसरा टप्पा: मनीष मिश्रा याने चालवलेल्या 'मनीवाइज', 'द अ‍ॅडव्हायझर' आणि 'प्रॉफिट यात्रा' सारख्या YouTube चॅनेलवर साधना ब्रॉडकास्टमधील गुंतवणूक ही एक चांगली संधी असल्याबद्दलचे प्रमोशनल व्हिडिओ अपलोड केले गेले. या व्हिडिओंमध्ये कृत्रिम व्यवहार दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले.

या 'पंप अँड डंप' स्कीममध्ये, मोठ्या गुंतवणूकदारांनी प्रथम शेअर्सची किंमत वाढवली आणि नंतर लहान व सामान्य गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यानंतर ते जास्त किमतीत विकून नफा कमावला. दुसरीकडे यामुळे लहान गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपयांपर्यंत मोठे नुकसान झाले, असे सेबीच्या अहवालात नमूद आहे.

सेबीने का केली कारवाई?जुलै ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत सेबीला या संदर्भात अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. त्यात साधना ब्रॉडकास्टचे शेअर्स त्यांच्या किमतीत फेरफार करून विकल्याचा आरोप होता. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दिशाभूल करणारे आणि चुकीची माहिती असलेले YouTube व्हिडिओ वापरले जात होते आणि यासाठी कोट्यवधी रुपये मार्केटिंगसाठी खर्च केले जात होते, असे तक्रारींमध्ये म्हटले होते.

वाचा - देशातील 'सर्वात महागडा' फ्लॅट मुंबईत! एक फूट ३ लाखांना, घरामुळे लीना गांधी चर्चेत, कोण आहेत त्या?

या तक्रारींनंतर सेबीने ८ मार्च २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एसबीएलच्या शेअर्समध्ये कथित फेरफार केल्याच्या प्रकरणाची चौकशी केली आणि २ मार्च २०२३ रोजी ३१ संस्थांविरुद्ध अंतरिम आदेश जारी केला होता, ज्यावर आता अंतिम कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :सेबीअर्शद वारसीबॉलिवूडशेअर बाजारशेअर बाजार