Anil Ambani: उद्योगपती अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या कर्ज खात्याला या महिन्याच्या सुरुवातीला एसबीआयकडून मोठा धक्का बसला होता. बँकेने डिसेंबर २०२३, मार्च २०२४ आणि सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवल्या होत्या. कंपनीच्या उत्तराचा आढावा घेतल्यानंतर बँकेने म्हटले होते की, अनिल अंबानी यांच्या कंपनीने त्यांच्या कर्जाच्या अटींचे पालन केले नाही. त्यानंतर आता अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत. अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये मुंबईत हे छापे टाकले जात आहेत. नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए), बँक ऑफ बडोदा आणि सीबीआयच्या दोन एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. कंपन्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांचीही झडती घेतली जात आहे.
ईडीला सार्वजनिक पैशाची उधळपट्टी केल्याचे पुरावे सापडले आहेत. यामध्ये अनेक संस्था, बँका, शेअरहोल्डर आणि गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे ईडीचे म्हणने आहे. २०१७ ते २०१९ दरम्यान येस बँकेकडून घेतलेल्या सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जात बेकायदेशीर फेरफार आणि गैरवापर झाल्याचा संशय आहे. लाचखोरीच्या दृष्टिकोनातूनही चौकशी केली जात असून, येस बँकेच्या प्रवर्तकांवरही संशय आहे.