रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गुरूवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ग्लोबल होण्याबाबत घोषणा केली. ग्लोबल प्लॅन्सबाबत येत्या काळात माहिती दिली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. "सौदी अरामकोच्या यासिर अल रुमायन यांना रिलायन्सच्या संचालक मंडळात सामील करण्यात आलं आहे. हे कंपनीच्या ग्लोबल बनण्याची सुरूवात आहे," असं अंबानी म्हणाले. गुरूवारी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४ वी सर्वसाधारण सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण या सभेत व्हर्च्युअली सहभागी झाले होते. यावेळी अंबानी यांनी गुगलसोबत तयार करण्यात येणाऱ्या जिओ फोन नेक्स्टचीही घोषणा केली. दरम्यान, रिलायन्स जिओ देशातील पहिलं 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
रिलायन्स जिओबद्दल घोषणा करताना जिओ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी डेटा कॅरिअर झाल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. तसंच सातत्यानं याबाबत चांगलं काम होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुकेश अंबानी यांनी एजीएमदरम्यान जिओ फोन नेक्स्टची घोषणा केली. अँड्रॉईडवर चालणारा हा स्मार्टफोन गुगल आणि जिओ यांनी मिळून तयार केला आहे. या वर्षी १० सप्टेंबर रोजी हा फोन उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "देशातील सर्वात पहिली 5G सेवा सुरूव करण्यासाठी कंपनी तयार आहे. कंपनीनं नुकतीच मुंबईत 1Gbps ची यशस्वी चाचणी घेतली आहे. याशिवाय कंपनीला सरकारकडून चाचणीसाठी स्पेक्ट्रम आणि मंजुरीदेखील मिळाल्या आहेत," असं अंबानी यांनी स्पष्ट केलं. "जिओ त्वरित 5G सेवा अपग्रेड करण्याच्या स्थितीत आहे. 5G इकोसिस्टम तयार करण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवरील पार्टनर्ससोबतही काम करत आहोत. जिओ केवळ भारताला 2G मुक्त नाही, तर 5G युक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कंपनीना ५.४० लाख कोटींचा महसूल२०२०-२१ या दरम्यान कंपनीला ५.४० लाख कोटी रूपयांता महसूल मिळाला आहे. तर यादरम्यान कंपनीचा नफाही ५३ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक होता. कंपनीनं २०२०-२१ या दरम्यान, कंपनीनं ३.२४ लाख कोटी रूपयांचं भांडवल उभं केलं आहे आणि ते आतापर्यंत कोणत्याही कंपनीनं उभ्या केलेल्या भांडवलापेक्षा अधिक असल्याचं अंबानी म्हणाले.