Join us  

आता तुमच्या महिन्याचं बजेट ठरवणार 'या' तीन व्यक्ती; निश्चित करणार तेलाच्या किमती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 5:10 PM

जगातील कोट्यवधी लोकांचं बजेट तिघांच्या हाती

नवी दिल्ली: खनिज तेलाच्या किमती निश्चित करण्यात ओपेक देशांची (तेल निर्यातदार देश) भूमिका महत्त्वाची होती. मात्र गेल्या काही दिवसातील घटनाक्रम पाहता आता तेलाच्या किमतीचं नियंत्रण ओपेकच्या हाती राहिलेलं नाही. यापुढे जगातील जवळपास सर्व देशांच्या अर्थव्यवस्था आणि त्या देशांमधील सर्वसामान्य जनता यांच्या महिन्याचं बजेट आता तीन व्यक्तींच्या हाती असेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि सौदी अरेबियायाच्या मोहम्मद बिन सलमान तेलाच्या किमती निश्चित करण्यात निर्णायक भूमिका बजावतील. मात्र या तिघांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. तेलाच्या उत्पादनात सध्या अमेरिका, रशिया आणि सौदी अरेबियाचा दबदबा आहे. या तीन देशांचं एकूण तेल उत्पादन ओपेकच्या 15 सदस्य देशांइतकं आहे. हे तीन देश खनिज तेलाचं विक्रमी उत्पादन करत आहेत. तेल उत्पादक देश दरवर्षी त्यांच्या उत्पादनात वाढ करतात. मात्र हे तीन देश उत्पादनात वाढ करणार नाहीत. सौदी अरेबिया आणि रशियानं जूनमध्ये एकत्रितपणे ओपेक समूहावर उत्पादन कमी करण्यासाठी दबाव आणला होता. 2017 पासून ओपेक समूहानं खनिज तेलाच्या उत्पादनात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे सौदी अरेबिया आणि रशियानंही उत्पादनात विक्रमी वाढ केली. याचवेळी अमेरिकेनंही तेलाचं उत्पादन वाढवलं होतं. तेलाचं उत्पादन वाढल्यानं किमतीत घसरण झाली. त्यामुळे सौदी अरेबियानं पुढील महिन्यापासून दररोज तेलाचं उत्पादन पाच लाख बॅरलनं कमी करण्याची घोषणा केली. या घोषणेला पुतीन यांनी समर्थन दिलं. मात्र ट्रम्प यांनी यांनी नाराजी व्यक्त केली. सौदी अरेबिया देशाची बहुतांश अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून आहे. सौदीच्या मोहम्मद बिन सलमान यांना देशातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महसुलाची आवश्यकता आहे. हा महसूल सलमान यांना तेल निर्यातीतून मिळतो. तर दुसरीकडे रशियानं तेल उत्पादनात कपात करण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. रशियाची अर्थव्यवस्था सौदीप्रमाणे तेलावर अवलंबून नाबी. मात्र पुतीन यांना सौदीसोबतचे संबंध सुधारायचे आहेत. त्यामुळे ते सौदीच्या तेल कपातीच्या निर्णयाचं यापुढेही समर्थन करु शकतात.  

टॅग्स :खनिज तेलसौदी अरेबियाअमेरिकारशियाडोनाल्ड ट्रम्पव्लादिमीर पुतिनइंधन दरवाढपेट्रोलडिझेल