PM Kisan 19th installment date : सध्या सर्वजण १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत. विशेषकरुन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची चर्चा आहे. आता प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. ही रक्कम वाढवून १२ हजार करण्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, त्याआधीच शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा १९वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर २,००० रुपये जमा केले जातात. यापूर्वी ५ ऑक्टोबर रोजी १८वा हप्ता वाशिम येथून हस्तांतरीत करण्यास सुरुवात केली होती. देशातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कधीपासून सुरू झाली?
केंद्रातील मोदी सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अर्थसहास्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. वर्षात ३ हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत पीएम किसानचे १८ हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ? असे तपासा.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १९वा हप्ता मिळेल की नाही हे सहज तपासता येईल.
वाचा - अर्थसंकल्पाविषयी 'या' ५ मनोरंजक गोष्टी ९९ टक्के लोकांना माहिती नसणार; तुम्हाला किती माहित?
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
- farmer corner वर क्लिक करा.
- एक नवीन पेज उघडेल.
- येथे लाभार्थी यादी पर्याय निवडा.
- एक फॉर्म उघडेल. यामध्ये प्रथम राज्याचे नाव, नंतर जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
- सर्व माहिती भरल्यानंतर get report वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी मिळेल.
- जर तुमचे नाव यादीत असेल तर तुमच्या खात्यातही पैसे येतील.