Join us

शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:59 IST

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात. या योजनेचा २१वा हप्ता कधी मिळणार?

PM Kisan Samman Nidhi : केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक कवच आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना शेती आणि घरगुती खर्चांसाठी थेट आर्थिक मदत पुरवते. योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६,००० रुपये जमा केले जातात, जे २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. आता शेतकरी २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही राज्यांमध्ये हा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो?या योजनेचा लाभ 'शेतकरी कुटुंबांना' मिळतो, ज्यात पती, पत्नी आणि १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांचा समावेश असतो. लाभार्थी कुटुंबाकडे २ हेक्टरपेक्षा कमी शेतीची जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थी पात्र आहेत की नाही, हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची सरकारे निश्चित करतात. अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमिनीच्या मालकीचे कागदपत्रे (७/१२ उतारा) आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो.

तुमचे नाव यादीत आहे की नाही, कसे तपासावे?

  • सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • होम पेजवरील "फार्मर्स कॉर्नर" मध्ये "बेनिफिशियरी स्टेटस" या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक भरा.
  • ही माहिती भरल्यावर तुम्हाला तुमच्या हप्त्यांची स्थिती आणि पात्रतेची संपूर्ण माहिती मिळेल.

२१ वा हप्ता कधी मिळणार?पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. काही राज्यांमध्ये दिवाळी २०२५ (ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत) हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. यापूर्वी, २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून जारी केला होता.

वाचा - ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड

ई-केवायसी (e-KYC) आवश्यकया योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी (Electronic Know Your Customer) पूर्ण करणे बंधनकारक आहे.शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वरूनच माहिती घ्यावी. कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर १५५२६१ किंवा ०११-२४३००६०६ वर संपर्क साधता येईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Gift for Farmers: Check PM Kisan 21st Installment Status Online

Web Summary : Farmers await the 21st PM Kisan installment. Check beneficiary status on pmkisan.gov.in using Aadhaar or bank details. e-KYC is mandatory. Expected by late October 2025.
टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरी