Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या जवळ पोहोचले 'गाझा'चे युद्ध; अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय धोक्यात, तुमच्या खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 17:50 IST

हुती दहशतवाद्यांनी शनिवारी इंधन घेऊन येणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोनने हल्ला केला.

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ तांबड्या समुद्रापर्यंत पोहोचली आहे. तांबडा समुद्र सध्या युद्धभूमी बनला आहे. इराण समर्थक हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हमासला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या हुतींनी जाहीर केले आहे की, जे जहाज इस्रायलला जात आहेत किंवा इस्त्रायलशी संबंधित आहे, त्यांना ते लक्ष्य करतील. 

भारतीय जहाजावर हल्लायामुळेच हुती दहशतवाद्यांनी शनिवारी भारतीय तिरंगा फडकवणाऱ्या जहाजावर ड्रोनने हल्ला केला. हे जहाज तेल घेऊन भारतात येत होते. हुती दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. ही काही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही हुती बंडखोरांनी अनेक व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केले आहे. तांबड्या समुद्रात हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेची चिंता वाढली आहे. 

तांबडा समुद्र का महत्त्वाचा आहे?जगातील 40 टक्के व्यापार तांबड्या समुद्रातून होतो. अनेक देशांची अर्थव्यवस्था या समुद्रावर अवलंबून आहे. हा समुद्र केवळ भारतासाठीच नाही तर जगभरातील देशांसाठी महत्त्वाचा आहे. दरवर्षी 17000 हून अधिक जहाजे येथून जातात. दरवर्षी 12 टक्के जागतिक व्यापार या समुद्रातून होतो. येथून दरवर्षी 10 ट्रिलियन डॉलर्सच्या मालाची आयात आणि निर्यात केली जाते. तांबड्या समुद्राने अमेरिका आणि युरोप, तसेच मध्य पूर्व आशियामधील अंतर कमी केले. 

महागाई वाढू शकतेतांबडा समुद्र युरोपला आशियाशी जोडतो. हा समुद्र पुढे सुएझ शहराला मिळतो, ज्यातून व्यापारी जहाजे जातात. हुती बंडखोरांमुळे शिपिंग कंपन्या येथून जाण्यास घाबरत आहेत. हे हल्ले असेच सुरू राहिल्यास कंपन्यांना मोठा मार्ग पत्करावा लागेल. मोठा मार्ग निवडणे म्हणजे खर्च वाढेल आणि खर्च वाढला तर महागाई वाढेल. महागाई वाढली तर सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार.    

टॅग्स :इस्रायल - हमास युद्धइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षनरेंद्र मोदीभारतव्यवसायगुंतवणूकइराणखनिज तेल