Join us

पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:41 IST

India Afghanistan Trade: अटारी-वाघा सीमा हा भारत आणि तालिबानशासित अफगाणिस्तानमधील एकमेव मंजूर व्यापारी मार्ग आहे.

India Afghanistan Trade: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर दिले, तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारही ठप्प झाला होता. सीमा बंद झाल्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवरुन मालाची वाहतूकही थांबली होती. पण, शुक्रवारपासून अटारी-वाघा सीमेवरून व्यापार पुन्हा सुरू झाला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे अटारी-वाघा सीमा बंद करण्यात आली होती. यामुळे पाकिस्तानच्या बाजूने वाघा सीमेवर सुमारे 50 ट्रक अडकले होते. यात अफगाणिस्तानातून आणलेला सुकामेवा आणि औषधी वनस्पती होते. पण, आता अटारी-वाघा सीमेवरुन व्यापारी क्रियाकलाप पुन्हा सुरू झाल्यामुळे, ज्या व्यापाऱ्यांसाठी हा मार्ग सुकामेवा आणि औषधी वनस्पतींच्या आयातीचे मुख्य साधन आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

अटारी आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, शुक्रवारी आलेले ट्रक तणावामुळे पाकिस्तानी सीमेवर अडकले होते. शुक्रवारी यापैकी सहा ट्रकना अटारी चेकपोस्टवरुन भारतात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. शनिवारीदेखील 10 हून अधिक भारतीय ट्रक एकात्मिक चेकपोस्ट अटारीमध्ये दाखल झाले, जे लोड झाल्यानंतर पुन्हा देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये रवाना होतील. 

भारत आणि अफगाणिस्तानमधील हा व्यापारी मार्ग खूप महत्त्वाचा आहे. अटारी-वाघा सीमा हा भारत आणि तालिबानशासित अफगाणिस्तानमधील एकमेव मंजूर व्यापारी मार्ग आहे. भारत प्रामुख्याने अफगाणिस्तानातून सुकामेवा आणि औषधी वनस्पती आयात करतो, जे बहुतांश कंधार आणि काबूलमधून येतात. हा मार्ग बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच, शिवाय बाजारात या वस्तूंच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला. पण, आता भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारी संबंध सुरू झाल्याने व्यापारी आनंदी आहेत.

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लाऑपरेशन सिंदूरभारतपाकिस्तानअफगाणिस्तानव्यवसाय