Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:07 IST

Group Health Insurance : नोकरी सोडणे किंवा बदलणे ही तुमच्या ऑफिस ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याच्या दिवशीच संपते. पण, पॉलिसी पोर्ट करुन तुम्ही तिचे फायदे मिळवू शकता.

Group Health Insurance : जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी बदलते किंवा सोडते, तेव्हा अनेकदा त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांची कंपनीची ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी त्याच दिवशी आपोआप संपुष्टात येते. अशा परिस्थितीत, जर कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवली, तर उपचाराचा संपूर्ण खर्च आपल्या खिशातून करण्याची वेळ येते. मात्र, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे! तुम्ही तुमच्या ग्रुप प्लॅनला वैयक्तिक किंवा फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये पोर्ट अर्थात ट्रान्सफर करू शकता आणि तेही जुने फायदे न गमावता.

पॉलिसी पोर्टिंगची प्रक्रिया नेमकी कशी चालते?पॉलिसी पोर्टिंगचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या कंपनीच्या ग्रुप पॉलिसीमधून बाहेर पडून कोणत्याही विमा कंपनीच्या रिटेल पॉलिसीमध्ये प्रवेश करता. ही प्रक्रिया तुमच्या जुन्या पॉलिसीमधील फायदे नव्या पॉलिसीत जतन करण्यासाठी मदत करते.या प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमची ग्रुप पॉलिसी संपण्याच्या किमान ४५ दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे.तुम्ही अर्ज केल्यानंतर, नवीन विमा कंपनी तुमची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि वय विचारात घेऊन तुमच्या नव्या पॉलिसीचा प्रीमियम निश्चित करते.एकदा मंजूरी मिळाल्यावर, तुमचा नवीन प्लॅन जुन्या पॉलिसीमध्ये कोणताही खंड न पडता लगेच सुरू होतो.

पोर्टिंगचे फायदे काय आहेत?पोर्टिंग प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, तुमचा वेटिंग पिरियड आणि तुम्ही पूर्वी घेतलेल्या क्लेमचा रेकॉर्ड नव्या पॉलिसीत ट्रान्सफर होतो.उदाहरणार्थ, जर तुम्ही ग्रुप पॉलिसीमध्ये २ वर्षांचा वेटिंग पिरियड पूर्ण केला असेल, तर तो कालावधी तुमच्या नवीन रिटेल प्लॅनमध्येही गणला जातो. जर तुमच्या नवीन पॉलिसीचा वेटिंग पिरियड ४ वर्षांचा असेल आणि तुम्ही जुन्या पॉलिसीमध्ये ३ वर्षे पूर्ण केली असतील, तर तुम्हाला आता केवळ १ वर्षाचाच वेटिंग पिरियड पूर्ण करावा लागेल.यामुळे तुम्हाला नवीन पॉलिसीमध्ये पहिल्या दिवसापासून क्लेमसाठी योग्य कव्हरेज मिळते. नवीन पॉलिसीच्या अटी आणि नियम थोडे वेगळे असू शकतात, जसे की रूम रेंट मर्यादा किंवा को-पेमेंट नियम.

या चुका टाळा, अन्यथा संधी गमवाल!नोकरी बदलल्यावर लोक पॉलिसी पोर्ट करण्याची सर्वात मोठी चूक करतात. ते नोकरी सोडल्यानंतर ही प्रक्रिया सुरू करतात, ज्यामुळे पॉलिसी लॅप्स होते आणि पोर्टिंगची संधी कायमची निघून जाते. त्यामुळे, नोकरी सोडण्यापूर्वी ४५ ते ६० दिवस आधीच पोर्टिंगची प्रक्रिया सुरू करणे सर्वोत्तम आहे. जुने पॉलिसी डॉक्युमेंट्स आणि क्लेम हिस्ट्रीची कागदपत्रे तयार ठेवा आणि नवीन पॉलिसीच्या सर्व अटी काळजीपूर्वक वाचून घ्या.

कव्हरेज वाढवणे शक्य आहे का?पोर्टिंग करताना तुम्हाला तुमचा सम इन्शुअर्ड (कव्हरेजची रक्कम) वाढवायचा असल्यास, तुम्ही तसे करू शकता, परंतु त्यासाठी वैद्यकीय अंडररायटिंग आवश्यक असते. विमा कंपनी तुमच्या वैद्यकीय तपासण्या करू शकते, वाढवलेल्या रकमेवर वेगळा वेटिंग पिरियड लावू शकते किंवा जास्त प्रीमियम आकारू शकते. केवळ जुन्या कव्हरेज रकमेवरच (आणि बोनसवर) कंटिन्युटीची हमी मिळते.

वाचा - गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित

तुमच्यासाठी जुन्या पॉलिसीचे फायदे नव्या पॉलिसीत जतन करण्याची ही प्रक्रिया अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे नोकरी सोडण्यापूर्वीच ही कार्यवाही सुरू करणे तुमच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Keep Health Insurance After Job Change: Policy Porting Explained

Web Summary : Don't lose health coverage! Port your group insurance to an individual plan when changing jobs. Apply 45 days before your policy expires to transfer benefits seamlessly, including waiting periods. Secure continuous coverage and financial protection.
टॅग्स :वैद्यकीयकामगारकर्मचारीआरोग्यपैसा