Join us

सोन्याला झळाळी, चांदी चमकली; २ हजाराची झेप घेत ५० हजाराचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 21:06 IST

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मंगळवारी जोरदार झटका बसला होता.

ठळक मुद्देआज सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचा दर वधारला. एक किलो चांदीच्या दरात बुधवारी २,०७० रुपयांची वाढ झाली.

एकीकडे आर्थिक मंदीची जोरदार चर्चा सुरू असल्यानं शेअर बाजारात अस्थिरता आहे. त्यामुळे सोन्याला 'अच्छे दिन' आल्याचं पाहायला मिळतंय. आज सलग दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोन्याचा दर वधारला. दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ३९,१२६ रुपयांवरून ३९,२४८ रुपये झाली. म्हणजेच सोनं १२२ रुपयांनी वधारलं. 

दुसरीकडे, चांदीची तर 'चांदीच' सुरू आहे. एक किलो चांदीच्या दरात बुधवारी २,०७० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता एक किलो चांदीचा दर ५०,१२५ रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर किंचित घटला. परंतु, भारतातील सराफा बाजारात त्याचा प्रभाव जाणवला नाही. चांदी मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातही चमकतेय. 

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मंगळवारी जोरदार झटका बसला होता. सेन्सेक्स तब्बल ७७० अंकांनी कोसळला होता, तर निफ्टीनं २२५ अंकांची डुबकी घेतली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांचे २ लाख ५५ हजार कोटी रुपये पाण्यात गेले होते. आज बाजार थोडा सावरला आहे. सेन्सेक्समध्ये १६१.८३ अंकांनी, तर निफ्टी ४६.७५ अंकांनी वाढ पाहायला मिळाली. शेअर बाजारात नकारात्मक वातावरण असतं, तेव्हा भारतीय गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतात, असा अनुभव आहे. त्याचाच प्रत्यय सध्या येतोय. त्यामुळे अलीकडेच ४० हजाराचा टप्पा पार करून आलेलं सोनं पुन्हा ही झेप घेऊ शकतं.

टॅग्स :सोनंचांदीशेअर बाजारपैसा