Join us

मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:51 IST

Global Layoffs Continue : नेस्प्रेसो कॉफी कॅप्सूल आणि किटकॅट कँडी बार बनवणारी नेस्ले कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची तयारी करत आहे.

Global Layoffs Continue : टेक जगतातील दिग्गज कंपन्या गुगल, मेटा, टीसीएस आणि विप्रो सारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केल्याने कर्मचारी आधीच चिंतेत असताना, आता जागतिक अन्न आणि पेय क्षेत्रातील मोठी कंपनी नेस्ले एसएने देखील मोठे कपातीचे पाऊल उचलले आहे. 'किट-कॅट' आणि 'नेस्प्रेसो' कॉफी कॅप्सूल बनवणाऱ्या या स्विस कंपनीने पुढील दोन वर्षांत १६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आखली आहे. नेस्लेच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही कपात सुमारे ६% असेल. गुरुवारी (१६ ऑक्टोबर) कंपनीने या योजनेचा खुलासा केला.

नवीन CEO फिलिप नव्राटिल यांचा मोठा निर्णय

  • नेस्लेमध्ये काही आठवड्यांपूर्वीच नवे सीईओ म्हणून फिलिप नव्राटिल यांनी पदभार स्वीकारला आणि लगेचच त्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.
  • कंपनीने २०२७ पर्यंत बचतीचे उद्दिष्ट सुमारे ३०० कोटी स्विस फ्रँक (जवळपास ३७० कोटी डॉलर) पर्यंत वाढवले आहे. यापूर्वी हे उद्दिष्ट २५० कोटी स्विस फ्रँक होते.
  • फिलिप नव्राटिल यांचे म्हणणे आहे की, "जग वेगाने बदलत आहे आणि नेस्लेला त्यापेक्षाही अधिक वेगाने बदलण्याची गरज आहे." यासाठी काही कठीण पण आवश्यक निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
  • विशेष म्हणजे, नेस्लेने तिसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) ४.३% ची अपेक्षेपेक्षा चांगली विक्री वाढ नोंदवली आहे. जास्त किंमती आणि अंतर्गत वाढीमुळे कंपनीला हे यश मिळाले आहे. चांगली वाढ होऊनही कपातीचा निर्णय घेणे, हे कंपनीच्या 'उत्पादकतेत वाढ' करण्याच्या धोरणाचे संकेत देते.

रणनीतीवर लक्षनवीन सीईओ फिलिप नव्राटिल हे कंपनीचे पूर्वीचे सीईओ लॉरेंट फ्रिक्से यांची जाहिरातींवरील खर्च वाढवणे, मोठ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणे आणि कमी कामगिरी करणाऱ्या युनिट्सपासून मुक्ती मिळवण्याची रणनीती पुढे नेणार आहेत. फिलिप नव्राटिल म्हणाले की, सध्या कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता 'वास्तविक अंतर्गत वाढ' वाढवणे आहे. यासाठी कंपनी आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओचे मूल्यांकन करत आहे.

वाचा - 'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक

मागील वादामुळे टॉप पोस्ट रिक्तफिलिप नव्राटिल यांना गेल्या महिन्यातच सीईओ बनवून कंपनीची कमान सोपवण्यात आली होती. त्यांच्या आधीचे सीईओ लॉरेंट फ्रिक्से यांना एका वर्षाच्या कार्यकाळात एका कर्मचाऱ्यासोबतच्या कथित प्रेमसंबंधांमुळे आणि ते लपवल्याच्या वादामुळे पदावरून हटवण्यात आले होते. या वादामुळे चेअरमन पॉल बुल्के यांनीही राजीनामा दिला होता. अशा वादग्रस्त परिस्थितीत कंपनीची कमान हाती घेतलेल्या नव्राटिल यांनी कंपनीत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nestle to lay off 16,000 employees despite profit surge.

Web Summary : Nestle, despite strong sales, plans to cut 16,000 jobs (6% of workforce) over two years. New CEO Philippe Navratil aims for increased efficiency and growth, targeting $370 million in savings. The move follows a period of leadership change due to controversy.
टॅग्स :नोकरीकर्मचारीपैसाशेअर बाजार