Budget 2026: जर तुम्हाला कॉफी पिण्याची आवड असेल, तर अर्थसंकल्प २०२६ तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेला नाही. या अर्थसंकल्पात कॉफी मशिनवर मिळणारी विशेष सवलत काढून घेण्यात आली आहे. यामुळे मशिनच्या किमती वाढणार असून पर्यायानं तुमची कॉफी देखील महाग होणार आहे.
अडीच टक्क्यांनी वाढणार ड्युटी
सध्या कॉफी मशिनवर १० टक्के आयात शुल्क लागतं, परंतु सवलतीमुळे ते ७.५ टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळत होतं. आता ही सवलत रद्द झाल्यामुळे मशिन खरेदीसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा २.५ टक्के अधिक पैसे मोजावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, रुपयाचे डॉलरच्या तुलनेत कमी झालेलं मूल्य हे देखील यंदाच्या महागाईमागील एक मोठं कारण ठरलं आहे.
Crypto बाजारात हाहाकार; Bitcoin ७५ हजार डॉलर्सच्या खाली, घसरणीचं कारण काय?
काय महागले आणि काय स्वस्त झालं?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. यामुळे कर्करोगावरील १७ औषधांसह ७ दुर्मिळ आजारांसाठी लागणारी औषधं आणि विशेष वैद्यकीय अन्नपदार्थ स्वस्त होतील. तसेच 'मायक्रोवेव्ह ओव्हन'मध्ये वापरले जाणारे सुटे भाग देखील स्वस्त होणार आहेत.
मात्र, आयात केलेल्या स्वस्त छत्र्या, एटीएम/कॅश डिस्पेंसर, कॉफी बनवण्याचं किंवा 'व्हेंडिंग' मशिन यांसारख्या वस्तू मूळ सीमा शुल्कातील (BCD) वाढीमुळे महाग होणार आहेत. दुसरीकडे, 'सोलर ग्लास'च्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'सोडियम अँटीमोनेट'च्या आयातीवरील कस्टम ड्युटीतून सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
अणुऊर्जा प्रकल्पांसाठी सवलत वाढवली
अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या आयातीवर मिळणारी सध्याची मूळ सीमा शुल्क सवलत २०३५ पर्यंत वाढवण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. ही सवलत सर्व अणुऊर्जा प्रकल्पांना, त्यांच्या क्षमतेचा विचार न करता लागू केली जाणार आहे.

