Budget 2026 Impact : इतिहासात पहिल्यांदाच रविवारी सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प देशातील बड्या अब्जाधीशांसाठी 'बॅड संडे' ठरला आहे. अर्थमंत्र्यांनी 'फ्युचर अँड ऑप्शन्स'वर वाढवलेल्या कराच्या ओझ्यामुळे दलाल स्ट्रीटवर भीतीचे वातावरण पसरले. परिणामी, शेअर बाजार धडाधड कोसळला आणि अवघ्या काही तासांत मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी यांच्यासह देशातील श्रीमंतांच्या संपत्तीतून अब्जावधी डॉलर्सची धूळधाण झाली.
'STT' च्या वाढीचा फटका
गुंतवणूकदारांना 'कॅपिटल गेन्स टॅक्स'मध्ये सवलतीची अपेक्षा होती, पण पदरी निराशा पडली. अर्थमंत्र्यांनी व्यवहारांवरील सुरक्षा व्यवहार कर (STT) वाढवल्याने ट्रेडर्समध्ये घबराट पसरली. सेन्सेक्स १५४७ अंकांनी तर निफ्टी ५९३ अंकांनी कोसळून बंद झाला. यामुळे बाजारातील गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणात घटले.
अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी 'गळती'
शेअर बाजारातील या सुनामीचा सर्वाधिक फटका रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदाणी ग्रुपच्या समभागांना बसला. यामुळे या समूहांच्या प्रवर्तकांच्या निव्वळ संपत्तीत मोठी घट झाली.
मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज)
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, अंबानींच्या संपत्तीत ३.५ अब्ज डॉलर (सुमारे ३२,१९४ कोटी रुपये) ची घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती ९४.६ अब्ज डॉलरवर (८.७० लाख कोटी रुपये) आली आहे.
गौतम अदाणी (अदाणी ग्रुप)
अदाणी एंटरप्रायजेस, अदाणी पॉवर आणि अदाणी ग्रीन यांसारखे शेअर्स कोसळल्याने गौतम अदाणी यांना २.४ अब्ज डॉलरचा (२२,०७६ कोटी रुपये) फटका बसला. त्यांची संपत्ती आता ५६.५ अब्ज डॉलरवर (५.१९ लाख कोटी रुपये) उरली आहे.
शिव नादर
एचसीएल टेकचा शेअर ३ टक्क्यांहून अधिक पडल्याने शिव नादर यांच्या संपत्तीत ४६.६ कोटी डॉलर (४,२८६ कोटी रुपये) ची घट झाली.
वाचा - गृहकर्जदारांना 'बजेट'चा दिलासा! घराच्या बांधकामापूर्वीच्या व्याजावरही मिळणार सूट; वाचा नवीन नियम
बाजारपेठेतील प्रतिक्रिया : अपेक्षाभंग की वास्तव?
तज्ज्ञांच्या मते, सरकारने 'स्पेक्टाक्युलेटिव्ह ट्रेडिंग'ला (सट्टा व्यापार) आळा घालण्यासाठी उचललेले हे पाऊल अल्पकाळात वेदनादायी ठरेल. मात्र, अंबानी-अदाणींसारख्या बड्या खेळाडूंना बसलेला हा धक्का केवळ 'कागदोपत्री' असून, बाजार सावरल्यानंतर ही संपत्ती पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

