तेहरान/नवी दिल्ली : इराणमध्ये नवीन सर्वोच्च नेत्याची निवड आणि सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या अनेक वर्षांतील उच्चांक गाठला. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत रातोरात ३० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड'ने प्रतिबॅरल १२० डॉलर्सचा टप्पा गाठल्याने संपूर्ण जगाचे धाबे दणाणले असून, जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. या युद्धामुळे आखाती देशांतील तेल उत्पादन आणि वाहतूक धोक्यात आली असून, त्याचे थेट पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडून महागाई वाढण्याची भीती आहे.
होर्मूझच्या सामुद्रधनीतून होणारी वाहतूक जवळजवळ थांबली आहे, यामुळे १९७० नंतरचे सर्वात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. युद्धाच्या दुसऱ्या आठवड्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. इराणने बहरिनमधील जलशुद्धीकरण केंद्रावर आणि सरकारी तेल शुद्धीकरण प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ले केले. यामुळे तेल कंपनीने आपला पुरवठा थांबवल्याची घोषणा केली आहे.
रशियन तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेने पुन्हा दिला सल्ला
अमेरिकेने भारताला समुद्रात अडकून पडलेले रशियन कच्चे तेल खरेदी करून ते भारतीय रिफायनऱ्यांकडे वळवण्याचा सल्ला दिला आहे. पुरवठ्यातील संभाव्य तुटवडा आणि तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने होणारी वाढ टाळण्यासाठी हा तात्पुरता आणि व्यावहारिक उपाय असल्याचे अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांनी स्पष्ट केले. भारताला रशियन तेल खरेदीसाठी ३० दिवसांची अमेरिकेकडून सवलत देण्यात आली आहे.
जी-७ देशांची तातडीची बैठक
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 'जी-७' देशांची तातडीची बैठक बोलावली आहे. बाजारातील तेलाचा तुटवडा भरून काढण्यासाठी विकसित देश आपल्या राखीव साठ्यातून तेल बाहेर काढण्याचा विचार करत आहेत.
'होर्मूझ'मुळे झाली जगाची कोंडी
जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी २० टक्के तेल ज्या 'होर्मूझ'च्या सामुद्रधनीतून वाहून नेले जाते, ती आता युद्धभूमी बनली आहे. इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या भीतीने सौदी अरेबिया, कुवेत, इराक आणि युएईमधून येणारी जहाजे थांबली आहेत.
तेलाचे दर दिवसभरात किती वाढले?
डब्ल्यूटीआय क्रूड — ११%
ब्रेंट क्रूड — १०%
मर्बन क्रूड — १०%
ओपेक बास्केट — ९%
...तरीही पेट्रोल-डिझेल स्वस्तच राहणार !
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या किमतींचे दडपण असले तरी, तूर्तास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे केंद्र सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सोमवारी स्पष्ट केले.
सिलिंडरसाठी २५ दिवस थांबावे लागणार !
आता एका गॅस सिलिंडरनंतर दुसऱ्या सिलिंडरच्या बुकिंगसाठी २५ दिवस वाट पाहावी लागेल. यापूर्वी हा कालावधी २१ दिवसांचा होता. दरम्यान, बेंगळुरूमध्ये हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवे सत्ताधीश ठरले
अयातुल्ला मोझ्तबा खामेनई यांची इराणचे सर्वोच्च नेता म्हणून निवड करण्यात आली. निवडीचे रशियाने स्वागत केले.
Web Summary : Oil prices surged to $120, triggering market crashes. Hormuz Strait disruption threatens global supply, impacting India. US advises India to buy Russian oil. G-7 considers releasing reserves. Iran's new leader appointed, Russia welcomes.
Web Summary : तेल की कीमतें $120 तक बढ़ीं, बाज़ारों में गिरावट। होर्मुज़ जलडमरूमध्य में व्यवधान से वैश्विक आपूर्ति खतरे में, भारत प्रभावित। अमेरिका ने भारत को रूसी तेल खरीदने की सलाह दी। जी-7 भंडार जारी करने पर विचार कर रहा है। ईरान के नए नेता नियुक्त, रूस ने स्वागत किया।