Join us
Daily Top 2Weekly Top 5

अब्जाधीशांना युद्धाचा शॉक; अव्वल ५०० श्रीमंतांची संपत्ती १८ दिवसांत ३२३.४० लाख कोटींनी घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:14 IST

तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रातील दिग्गजांसाठी ‘ब्लॅक मार्च’; कच्च्या तेलाच्या भडक्यात टेस्लाची ‘बॅटरी’ उतरली

नवी दिल्ली : इराण-इस्रायलयुद्धाच्या वणव्याने केवळ सीमाच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेचा पायाही हादरवून टाकला आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका जगातील अव्वल ५०० श्रीमंतांना बसला असून, अवघ्या १८ दिवसांत त्यांच्या संपत्तीत तब्बल ३.५ ट्रिलियन डॉलर (सुमारे ३२३.४० लाख कोटी रुपये)ची घट झाली आहे. विशेषतः  तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील दिग्गजांसाठी हा मार्च महिना ‘ब्लॅक मार्च’ ठरत आहे.

जागतिक बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि लॉजिस्टिक्स खर्च वाढल्यामुळे मोठ्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले. परिणामी, इलॉन मस्क आणि जेफ बेजोस यांसारख्या आघाडीच्या अब्जाधीशांना सर्वाधिक फटका बसला. या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी २०व्या स्थानी पोहोचले आहेत.

मुकेश अंबानी टॉप - २० मध्ये : मुकेश अंबानी यांची संपत्ती सध्या ९९.७ अब्ज डॉलर्स इतकी असून, जागतिक अब्जाधीशांच्या यादीत ते २०व्या स्थानी आहेत. २०२४ मध्ये अंबानी यांची संपत्ती ११६ अब्ज डॉलर्स इतकी होती. भारताचे उद्योगपती गौतम अदानी सध्या ३०व्या स्थानी आहेत.

मस्क यांच्या संपत्तीत मोठी घसरण, शेअर्सही आपटले जगातील नंबर वन श्रीमंत इलॉन मस्क यांच्यासाठी हे युद्ध दुहेरी संकट घेऊन आले आहे. कच्च्या तेलाच्या किमती भडकल्याने ईव्ही पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, टेस्लाचे शेअर्स १५ दिवसांत १२% कोसळले आहेत. मस्क यांची संपत्तीही ८३४ अब्ज डॉलरच्या आसपास आली आहे.

बेजोस यांनाही मोठा फटकाअमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले होते. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे शिपिंग खर्च वाढण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्री केली. परिणामी, बेजोस यांच्या संपत्तीत घट झाली होती. नंतर त्यात वाढ झाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : War Shock: Billionaires Lose Billions Amidst Global Economic Turmoil

Web Summary : Iran-Israel tensions rattled global markets, impacting the world's richest. The top 500 billionaires' wealth decreased by $3.5 trillion in 18 days. Tech and manufacturing giants like Musk and Bezos suffered losses due to market volatility and rising oil prices. Mukesh Ambani ranked 20th globally.
टॅग्स :एलन रीव्ह मस्कयुद्धइराणइस्रायलअमेरिका