Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम शिरूरला वरदान ठरणारा थिटेवाडी बंधारा भरला; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:26 IST

Thitewadi Dam : पाबळ (ता. शिरूर) सह वेळनदी भागातील खेड व आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरात गेले आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पाबळ (ता. शिरूर) सह वेळनदी भागातील खेड व आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरात गेले आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला आहे. शनिवारी सकाळी सांडव्यातून वेळनदीत पुढे पाणी सुरू झाले. बंधारा भरल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाबळ, थिटेवाडी, केन्दुर ग्रामस्थांनी धरण क्षेत्रात आलेल्या पाण्याची विधिवत पूजा केली. मागील वर्षी काहीसा कमी प्रमाणात पाणीसाठा असलेला हा बंधारा उन्हाळ्यात कोरडा पडला होता तर  मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात हा बंधारा पावसाने भरला होता. चालूवर्षी दोन महिने अगोदर हा बंधारा शंभर टक्के भरला आहे.

मागील काही दिवस पावसाने हजेरी लावल्याने या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. खैरेनगर, धामारी, पाबळ या भागात पिण्याच्या पाण्यासाठी थिटेवाडी बंधाऱ्यातून अनेक योजना करण्यात आल्या आहेत. बंधारा कोरडा पडल्यानंतर सर्व योजना बंद पडल्या होत्या. त्याचबरोबर या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

पाणीप्रश्न मार्गी लागणार

• थिटेवाडी बंधाऱ्यात पाणी आल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या काळात या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका १२ गावांना बसतो.

• थिटेवाडी बंधाऱ्यात डिंभा किंवा चासकमानचे पाणी सोडण्यासाठी गेली अनेक वर्ष आंदोलने केली जात आहेत. पावसाळ्यानंतर ही आंदोलनाची धार कमी होते व पुन्हा बंधारा कोरडा पडला की, आंदोलने सुरू होतात.

• मात्र सध्या बंधारा भरल्याने या भागात आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा : ताडकळस येथील २२ वर्षीय पदवीधर तरुणाने भाजीपाला उत्पादनातून मिळविले नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीजलवाहतूकपुणेपाऊस