Join us

निम्न दुधना प्रकल्पातून यंदा रब्बीसाठी तीन तर उन्हाळी पिकासाठी दोन पाणी पाळ्या सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:45 IST

Water Release From Nirm Dudhana Dam : निम्न दुधना प्रकल्पात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत चौपट जिवंत पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठीदेखील मुबलक पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.

शेषराव वायाळ 

निम्न दुधना प्रकल्पात यंदा मागील वर्षीच्या तुलनेत चौपट जिवंत पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठीदेखील मुबलक पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा धरणात ५८.६७ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात केवळ १६.९५ टक्केच पाणीसाठा होता.

यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने सर्व धरणे ओव्हरफ्लो होण्याबरोबरच पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याखालील पिकात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे निम्न दुधना प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता घटली असली तरीही यंदा धरणात मुबलक पाणीसाठा आहे.

या धरणावर जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, सेलू शहरांसह वॉटर ग्रीड योजनेचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्याने धरण मृतसाठ्यात येण्याबरोबरच या परिसरातील बागायती क्षेत्रही घटले होते. मात्र, यंदा धरणात पाणी असल्याने शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.

५८.६७ टक्के जिवंत पाणीसाठा

यंदा धरणामध्ये ५८.६७ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात केवळ १६.९५ टक्केच पाणीसाठा होता.

मुबलक बॅक वॉटरमुळे पाइपलाइनला जीवदान

या धरणाच्या बॅक वॉटरवर शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पाइपलाइन करून शेतात पाणी नेले आहे. मागील वर्षी धरणात पाणी नसल्याने या पाइपलाइन शोभेच्या वस्तू बनल्या होत्या. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर असल्याने या पाइपलाइनला जीवदान मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यंदा पाणीटंचाईचे सावट राहणार नाही

मागील वर्षी धरणात पाणीच नसल्याने नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. परंतु, यंदा धरणात ५८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही.

रब्बीसह उन्हाळी पूर्ण पाळ्या मिळणार

मागील वर्षी पाणी नसल्याने डाव्या, उजव्या कालव्यातून रब्बी व उन्हाळी पिकांसाठी एकही थेंबही सोडले नव्हते. यंदा रब्बीसाठी तीन व उन्हाळी पिकासाठी दोन पाणी पाळ्या सोडणार आहे.

टरबूजसह इतर बागायती पिकांकडे कल

गेल्या वर्षी सुरूवातीपासून पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रब्बीसह इतर पिकांच्या लागवडीतही घट झाली होती. मात्र, यंदा टरबूज, खरबूज व इतर बागायती पिकांकडे कल वाढवला आहे.

हेही वाचा : Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात

टॅग्स :पाणीजालनामराठवाडाशेतकरीशेतीजलवाहतूक