गौरव सांगावकरराधानगरी : देशातील दूसरे व राज्यातील स्वयंचलित दरवाजे असणारे पहिले धरण म्हणून 'राधानगरी'ची ओळख आहे. महान अभियंता डॉ. एम. विश्वेश्वरैया यांनी या धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांची रचना केली होती.
सहा ते सात दशकांनंतरही हे धरण अभियंत्यांच्या कार्याची साक्ष देत आहे. त्यांनी दाखवून दिले की, अभियंता केवळ पूल, धरणे वा रस्ते उभारत नाही, तर समाजाच्या भविष्याचा पाया रचतो.
राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य म्हणून या धरणाची ओळख आहे धरण केवळ अभ्यास करण्यासारखे तंत्रज्ञान नसून, इतिहासही आहे. छोट्या संस्थानच्या बचतीतून १९०७ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी या धरणासाठी योजना पुढे आणली.
त्यांच्या राज्यकारभारात बांधकाम खात्यांतर्गत स्वतंत्र असा पाटबंधारे विभाग चालू केला होता. १९०९ मध्ये धरणाचे बांधकाम सुरू झाले.
शाहू महाराजांनी धरणपूर्ततेसाठी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लेमिंग्टन, सर जॉर्ज क्लार्क यांच्यासह प्रमुख अभियंता हिल यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. आर्थिक अडचणीमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले.
१९४९ मध्ये धरणात सर्वप्रथम ०.६०० टीएमसी साठा केला. धरणाची सुरक्षा व मजबुतीसाठी ड्रिलिंग करून भूकंप-प्रतिरोधक शिसे भरून घेतले होते. १९५२ मध्ये पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र उभारले.
१.२ मेगावॅट क्षमतेची चार जनित्रे व इंग्लंडमधील स्टपोर्ड कंपनीच्या बनावटीची चार जनित्रे वीजनिर्मितीची साक्ष देतात; पण हे जलविद्युत केंद्र २०१७ पासून बंद आहे.
धरणाचा आढावा◼️ तज्ज्ञ अभियंते, निपुण कारागीर, दोन हजारहून अधिकजणांचा कामात सहभाग.◼️ १९०९ मध्ये बांधकामाला सुरुवात.◼️ १९१८ पर्यंत १४ लाख रुपये खर्च.◼️ १९४९ ते १९५५ या काळात २४५ लाख रुपये खर्च.◼️ १९५७ मध्ये काम अंतिम टप्प्यात.
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांची कार्यतत्परता, नियोजनशक्ती आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्येक अभियंत्यांसाठी प्रेरणादायी आहेत. - विनायक खोत, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पं. स., राधानगरी
अधिक वाचा: शेतरस्त्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' ह्या नव्या योजनेची घोषणा; कशी होणार कार्यवाही?