Join us

Bhatghar Dam भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग थांबवला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 9:52 AM

भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते.

आगामी पाणीटंचाईची परिस्थिती पाहता भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यासाठी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या ४२ गावातील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा आणि जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. अखेर शुक्रवारी सायंकाळी भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग पाटबंधारे विभागाने बंद केला आहे.

भाटघर धरण पुनर्वसन समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. यावेळी काळूराम मळेकर, सोमनाथ वचकल, नितीन बांदल, सचिन बांदल, अंकुश खंडाळे, अभिषेक येलगुडे, संतोष बांदल उपस्थित होते.

मागील अनेक महिन्यांपासून भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे धरणात ११ टक्के पाणीसाठा राहिला होता. त्यामुळे भविष्यात भाटघर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ४२ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

त्यामुळे आमदार संग्राम थोपटे व पाटबंधारे विभागाला भाटघर धरण प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने निवेदन देऊन जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे भाटघर धरण पुनर्वसन समितीच्या लढ्याला यश आलेले आहे.

चार तालुक्यांना जाते पाणी- भाटघर धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते आणि उन्हाळ्यात सदरचे पाणी नीरा नदीतून वीर धरणात आणि तिथून उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस या तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी जाते.त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात धरणे रिकामी होतात. त्यामुळे धरणाच्या कामासाठी घरेदारे जमिनी सोडलेल्या ४२ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एप्रिलनंतर गंभीर होतो

टॅग्स :धरणपाणीशेतीशेतकरीबारामतीफलटणइंदापूरमाळशिरस