मागील काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत असलेले किमान तापमान शनिवारी पुन्हा १२ अंशापर्यंत उतरले. पुढील पाच दिवस आणखीन किमान तापमानात घट होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. थंडीची लाट येण्याची शक्यता गृहित धरून सोलापूर जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पुढील आठवडाभर थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने जिल्ह्यात थंडीची लाट राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तसेच काही भागात किमान तापमानात आणखी घट होईल, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी सोलापूरचे किमान तापमान १२.६ तर कमाल तापमान ३२.१ अंश सेल्सिअस असे नोंदले गेले आहे.
सापेक्ष आर्द्रता २८ टक्के नोंद झाली आहे. रात्री व पहाटे तापमान १० अंश सेल्सिअसच्या जवळ जात असून दाट धुके व थंड वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी वर्गासाठी ही थंडी विशेष चिंतेची मानली जात आहे. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तातडीने डॉक्टरांना भेटा, औषधोपचार घ्या, थंडी असताना विनाकारण घराबाहेर पडू नका असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
सोलापूरकरांनो हे करू नका
• थंडीच्या वेळेत अनावश्यक बाहेर जाणे टाळा.
• हलके किंवा ओले कपडे परिधान करू नका.
• दाट धुके असताना अतिवेगाने वाहने चालवू नका.
• सर्दी, खोकला अथवा तापाकडे दुर्लक्ष करू नका.
पुढील पाच दिवस तापमान
• १४ डिसेंबर - १३.०
• १५ डिसेंबर - १४.०
• १६ डिसेंबर - १४.०
• १७ डिसेंबर - १५.०
• १८ डिसेंबर - १५.०
नागरिकांनो हे करा!
• जास्त वेळ घरात रहा, प्रवास टाळा.
• उबदार कपडे परिधान करा.
• टोपी, मफलर, हातमोजे, स्वेटर वापरा.
• पौष्टिक आहार घ्या, गरम द्रवपदार्थ प्या.
• व्हिटॅमिन-सीयुक्त फळे, भाज्या खा.
• वयोवृद्ध व लहान मुलांची काळजी घ्या.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
